विशाळगड : सुभाष पाटील : छत्रपती शिवरायांच्या आचार, विचार, धैर्य, नेतृत्व, नितीधैर्य, विद्वत्ता, चारित्र्य संपन्नता आजदेखील युवकांसाठी आदर्श आहे. राष्ट्रीय छात्र सेनेच्या खडतर प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना संघटन कौशल्य, समन्वय, सजगता अंगी बाळगली जाऊन कौशल्य जीवनात यशस्वी होण्यास मदत करतील, असे प्रतिपादन कॅम्प कमांडर जे. पी. सत्तीगिरी यांनी केले. ( शिवाजी ट्रेल ट्रेक )
संबंधित बातम्या
गजापूर येथे 'शिवाजी ट्रेल ट्रेक' राष्ट्रीय शिबीर मोहिमेत देशभरातून आलेल्या छात्रसैनिकांच्या पदभ्रमंती मोहिमेचा सांगता समारंभ झाला. याप्रसंगी छात्रसैनिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सुभेदार मेजर पी. बी. थापा, मेजर नानासाहेब यादव, मेजर संदीप उपाध्याय, सामाजिक कार्यकर्ते संजयसिंह पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवाजी पदभ्रमती दरम्यान छात्रसैनिक पावनखिंड या ऐतिहासिक पावनभूमीला भेट देत असत. यावेळी शिवकाळातील 'पन्हाळा ते पावनखिंड' दरम्यानच्या रणसंग्रामाची माहिती छात्रसैनिकांना देण्यात आली. पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष पावनखिंड पाहून छात्रसैनिक भारावून जातात.
शिस्त, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रप्रेम, श्रद्धा आणि विश्वास याची शिकवण 'शिवाजी ट्रेल ट्रेक' कॅम्पमधून मिळली. छत्रपती शिवरायांच्या नावाने सुरू असलेल्या ट्रेल ट्रेकमधून तरुणांमध्ये नवी उमेद व प्रेरणा मिळते. शिवाजी महाराज पन्हाळ्याहून पावनखिंडीपर्यंत ज्या मार्गाने गेले त्या मार्गावरून जाण्याची संधी यानिमित्ताने एनसीसी कॅंडेटना लाभली. त्यांना गड किल्ले, ऐतिहासिक पंरपरा, नद्या, विविध प्रदेश आणि छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची माहिती मिळाल्याने छात्रसैनिक आनंदीत होते.
राष्ट्रीय छात्र सेनामार्फत आयोजित 'शिवाजी ट्रेल ट्रेक' मोहिमेत दिल्ली, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पॉंडेचरी, कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रातून आलेल्या एक हजार विद्यार्थ्यांचा सहभाग होता. पन्हाळापासून विशाळगडपर्यंत बांबवडे, शाहूवाडी, पांढरेपाणी, गजापूर असा ट्रेकचा मार्ग होता.
कॅम्प यशस्वीतेसाठी कॅम्प कमांडिंग ऑफिसर कर्नल जे. पी. सत्तीगिरी, सुभेदार मेजर पी. बी. थापा, नानासाहेब यादव, सुभेदार संजय उपाध्याय, सुभेदार महादेव सावंत, सुभेदार राजेंद्र तनंगी, बीएचएम विक्रम पाटील आदींसह अन्य ऑफिसर यांनी परिश्रम घेतले आहेत.