शेतकर्‍यांच्या सर्वच नुकसानीचे पंचनामे करणार : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील | पुढारी

शेतकर्‍यांच्या सर्वच नुकसानीचे पंचनामे करणार : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात गारपिटीमुळे नुकसान झालेल्या गावांना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल भेट देऊन शेतकर्‍यांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी गारपिटीमुळे नुकसान झालेल्या गावांचे 100 टक्के पंचनामे करण्याचे व जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मंत्री विखे जिल्हाधिकार्‍यांना दिल्या. तालुक्यात वडुले, सांगवी सूर्या, पानोली आदी गावांमध्ये नुकत्याच झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या शेतीमाल, फळबागांचे मोठे नुकसान झाले. महसूल मंत्री विखे पाटील यांनी या भागाचा दौरा करीत शेतकर्‍यांना आधार दिला.

यावेळी महिला शेतकर्‍यांनी आमचे पूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून असून, गारपिटीमुळे संपूर्ण शेतपिकांचे नुकसान झाले. आम्ही आता वर्षभर काय खायचं? असा सवाल पालकमंत्र्यांना केला. यावर पालकमंत्र्यांनी अस्मानी संकट आहे, त्या संकटातून बाहेर आले पाहिजे. शासनाच्या वतीने सर्वतोपरीने मदत करण्याचे आश्वासन देत त्यांनी शेतकर्‍यांना धीर दिला. गांजी भोयरे येथील एकनाथ गंगाराम खोडदे व शिवाजी दादाभाऊ खणसे यांच्या कांदा पिकाचे गारपिटीने नुकसान झाले. त्याचीही पाहणी मंत्र्यांनी केली. त्यानंतर कोंडीभाऊ कोठावळे, महादेव आढाव यांच्या ड्रॅगन फ्रूटची पाहणी केली. बाळासाहेब निमोणकर यांच्या कांदा पिकाची व पानोली येथील उषा विजय मंडलिक यांच्या ज्वारी पिकाची पाहणी केली.

टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्याच्या सूचना मंत्री विखे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, प्रांताधिकारी गणेश राठोड, तहसीलदार गायत्री सौंदाणे सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते.
यावेळी भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, माजी समिती सभापती काशिनाथ दाते, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, माजी सभापती गणेश शेळके, सुनील थोरात, सुभाष दुधाडे, दिनेश बाबर, सोन्याबापू भापकर, पंकज कारखिले, मनोज मुंगसे, युवराज पठारे, दत्ता पवार, किरण कोकाटे, लहू भालेकर आदी उपस्थित होते.

हातावरचे पोट, करायचे काय?
पावसाने आमच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. त्यामुळे आम्हाला झोप येत नाही. जनावरांना चारा नाही. रोजगार नाही, हातावरचे पोट आहे. आम्ही करायचे काय. कुटूंबातील सदस्यांचे निधन झाल्यासारखी परिस्थिती गारपिटीमुळे निर्माण झाली असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरल्याचे महिलांनी सांगितले.

शेतकर्‍यांना शंभर टक्के मदत : विखे
जनावरांना लागणारा चारा प्रशासनाकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. तीन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाईची मर्यादा निश्चित केली आहे शेतकर्‍यांना शंभर टक्के मदत करण्याची भूमिका सरकारची राहील, असे आश्वासन पालकमंत्री विखे यांनी दिले.

Back to top button