Shiv Jayanti Utsav Kolhapur
कोल्हापूर : कडाडणारी हलगी, थिरकणारे पाय, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, ऐतिहासिक वेशभूषेत सहभागी विद्यार्थी अशा शिवमय वातावरणात संयुक्त मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळातर्फे मिरजकर तिकटी येथे शिवजयंती उत्सवाने उंची गाठली.
रविवारी शिवकालीन युद्धकलांचे प्रात्यक्षिक झाले. मधुरिमाराजे यांच्या हस्ते शस्त्र पूजन झाले. एकेरी, दुहाती लाठी, पट्टा, तलवार, फरी गदका यांच्या लढतींना टाळ्यांचा झाला. बाराबंदीच्या पोशाखात मुले, तर नऊवारी साडी नेसून मुली सहभागी झाल्या होत्या. मर्दानी कलाविशारद आनंदराव पोवार प्राचीन युद्ध कला प्रशिक्षण संस्था (शिवाजी पेठ), राजे मर्दानी आखाडा (पाचगाव), शिवगर्जना मर्दानी आखाडा (जरगनगर), हिंद प्रतिष्ठान मदांनी आखाडा, जय भवानी मर्दानी खेळाच्या आखाड्घांतील (दौलतनगर) खेळाडूंनी प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी अध्यक्ष बाळासाहेब पोवार, उपाध्यक्ष उत्कर्ष फडतरे, वस्ताद पंडित पोवार, संतोष माळी, अभिषेक कित्तूर, शुभम जाधव, सौरभजौंदाळ, बाबा पाटें, उदय पाटील, चंद्रकांत भोसले, अनिकेत घोटणे उपस्थित होते.
संयुक्त पंचगंगा शुक्रवार पेठेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रविवारी हलगी वादन स्पर्धेने शिवजयंती उत्सवात रंग भरले. शुक्रवार पेठ पंचगंगा परिसरात स्पर्धा झाल्या. ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेत जिल्ह्यासह सांगली, सातारा, सांगोला, गारगोटी येथून १५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. कडाडणाऱ्या हलगी वादनाने स्पर्धेचा माहोल रंगला. एकेक स्पर्धक मंचावर येऊन हलगी वादनाची कला सादर करत होते. हलगी वादनाने उपस्थितांसह परीक्षकांचीही मने जिंकली.