तानाजी खोत
Kolhapur Mango Delivery Scheme
कोल्हापूर : कोल्हापुरात पोस्टमन आता केवळ पत्रे आणि डाकच नाही तर देवगड आणि रत्नागिरीचा मधुर हापूस आंबाही घेऊन तुम्हाला थेट घरपोच देणार आहे. पोस्ट खात्याने गेल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली घरपोच आंबा विक्री योजना यंदा अधिक व्यापक स्वरूपात राबवली असून, त्याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
पोस्टामार्फत थेट शेतकरी ते ग्राहक आंबा विक्रीची संकल्पना कोरोना काळात उदयास आली. बाजारपेठा बंद असल्याने कोकणातील शेतकऱ्यांचा आंबा सडून जात होता. त्याला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पोस्ट खात्याने पुढाकार घेतला. त्यातून ही योजना सुरू झाली. गोवा विभागीय कार्यालयाची रितसर परवानगी घेऊन अधिकृतपणे पोस्टामार्फत आंबा विकला जात आहे.
या योजनेच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांकडून निवडक हापूस आंबा पोस्ट विभाग स्वतः उचलतो. पोस्टाच्या वाहनातून तो एकत्र करून पोस्ट कार्यालयानुसार वितरीत करण्यात येतो. गोवा विभागांतर्गत येणाऱ्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि गोवा राज्य हा प्रदेश येतो; पण कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात
पोस्टामार्फत आंब्याला मागणी वाढत असून, याच जिल्ह्यात योजनेचा सध्या विस्तार होत आहे. शेतकऱ्यांच्या बागेतून थेट पोस्टाच्या वाहनांतून आंबा उचलला जातो आणि तो कोल्हापूर, सांगली आणि गोव्यातील पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचवला जातो. सुरुवातीला कोल्हापुरातील ११ पोस्ट कार्यालयांतून आंबा वितरीत होत होता. त्यात आता तीन कार्यालयांची वाढ झाली आहे.
कोल्हापूर पोस्ट कार्यालयाचे प्रवर अधीक्षक अनुराग निखारे म्हणाले, गेल्यावर्षी हंगामाच्या शेवटी ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवली; पण यंदा मोठ्या प्रमाणावर ही योजना सुरू केली. सुरुवातीपासूनच उत्तम प्रतिसाद मिळतोय. लोकांचा विश्वास आणि पोस्टाचा रीच दोन्हींचा उपयोग करून शेती आणि ग्राहक यांना जोडणारा हा उपक्रम आहे. पोस्ट खात्याला यामुळे नव्या स्वरूपाचा महसूल मिळतोय आणि पोस्टमनही एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.
ऑर्डर घेण्याचे दिवस : गुरुवार ते शनिवार
दर : ११०० मध्ये दोन डझन (प्रचलित बाजारभावानुसार बदलतात)
घरपोच सेवा शुल्क: ५० रुपये अतिरिक्त
मागील आठवड्यातील विक्री : सांगली ३६७ पेट्या, कोल्हापूर २१८ पेट्या
कोल्हापुरातील पोस्ट ऑफिस : कोल्हापूर हेड ऑफिस, साने गुरुजी वसाहत, प्रतिभानगर, फुलेवाडी, कळंबा, शनिवार पेठ, कोल्हापूर रेल्वे स्टेशन, रुईकर कॉलनी, शिवाजी विद्यापीठ, हातकणंगले, गांधीनगर, जयसिंगपूर, गडहिंग्लज, इचलकरंजी.
सांगलीतील पोस्ट ऑफिस : सांगली हेड ऑफिस, मिरज,इस्लामपूर, सिटी पोस्ट ऑफिस, वालचंदनगर, सुभेदार वसाहत, तासगाव, कुपवाड, जत, आटपाडी, विटा.