

कोल्हापूर : गोरगरीब जनतेला स्वस्त दरात पोटभर जेवण देणारी ‘शिवभोजन थाळी’ ही योजनाही बंद होण्याच्या मार्गावर आहे. या योजनेंतर्गत दिले जाणारे अनुदान गेले चार महिने थकले आहे. अनुदानाअभावी केंद्र सुरू ठेवताना केंद्र चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनुदानच नसेल तर ही केंद्रे चालवायची कशी? असा सवाल केंद्र चालक करत आहेत.
शिवभोजन थाळी दहा रुपयांत मिळते. मात्र, राज्य शासन केंद्र चालकाना शहरी भागात प्रति थाळी 50 रुपये तर ग्रामीण भागात 35 रुपयांचे अनुदान देते. केंद्रनिहाय थाळीची मर्यादाही देण्यात आली आहे. त्यानुसार दर महिन्याला अनुदान दिले जाते.
मात्र, ही योजनाच आता आर्थिक अडचणीत आली आहे. गेल्या वर्षभरापासून या योजनेचे अनुदान रखडण्यास सुरुवात झाली आहे, प्रारंभी महिन्याचे अनुदान रखडत होते, नंतर ते दोन महिन्याचे रखडत गेले. सध्या राज्यात एप्रिल ते जुलै अशा चार महिन्यांचे अनुदान रखडले आहे.
राज्य शासन ही योजना बंद होणार नाही असे म्हणत असले तरी वेळेत अनुदान मिळत नसल्याने काहींनी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेबाबत काटकसरीचे धोरण अवलंबले आहे.