कोल्हापूर : दिवसभर सुरू असणारी पावसाची रिमझिम अशा वातावरणात रविवारी देखावे पाहाण्यासाठी आबालवृद्धांच्या गर्दीने अक्षरश: रस्ते फुललेे. दुपारी चार वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत शहरातील विविध पेठा, राजारामपुरी, शाहूपुरी, छत्रपती शिवाजी चौकात गणेश दर्शन व देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी रविवारी कोल्हापुरातील पेठा व उपनगरातील बहुतांशी गणेशमूर्ती, विविध प्रतिकृती, तांत्रिक देखावे खुले झाल्याने ते पाहण्यासाठी लोक सहकुटुंब बाहेर पडलेे.
छत्रपती शिवाजी चौकातील 21 फुटी गणेशमूर्ती, रंकाळा स्टँड परिसरातील गोल सर्कल मित्र मंडळ, व्हीनस कॉनर मित्र मंडळाचा तांत्रिक देखावा, शाहूपुरीतील विविध मंडळांचे तांत्रिक देखावे, मंदिरांच्या प्रतिकृती, पेठा व उपनगरातील वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती दर्शनासाठी खुल्या झाल्याने त्या पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती.