शिरोली एमआयडीसी, पुढारी वृत्तसेवा : पुलाची शिरोली, नागाव, टोप परिसरात विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह जोरदार वळिव पावसाने हजेरी लावून एक तास झोडपून काढले. या पावसात मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली . सकल भागात पाण्याचा निचरा न झाल्याने काही परिसर थोड्या काळासाठी जलमय झाला होता.
शुक्रवारी (दि.10) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सुसाट्याच्या वारा सुटून काही वेळ धुळीचे लोट उठले होते. त्यानंतर विजेच्या कडकडांटसह वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली, अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसात शेतकऱ्यांनी वाळलेल्या गवताचे मोठे नुकसान झाले. दरम्यान पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतातील मशागतीला वातावरण पोषक मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
या वळीव पावसात महामार्गावरील बोगद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले तर काही ठिकाणी मोठ्या झाडांची पडझड झाली. मागील काही दिवसापासून परिसरात प्रचंड उकाडा जाणवत होता. पारा 38 अंशावर गेल्याने अंगाची लाही-लाही होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वत्र गारवा पसरला. चिमुकल्यांनी या पहिल्या पावसाचा आनंद लुटला. अशाच प्रकारे जोरदार पाऊसाची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.