

कोल्हापूर : इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाला राजभरातून विरोध होत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील हिंदी भाषा अनिवार्य करण्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांवर पहिली पासून हिदी सक्ती योग्य नाही. सरकारला पहिलीपासून हिंदी का हवी आहे ?सरकारचा हा हट्ट का? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. ते आज (दि.२७) कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चा आधार घेत राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासून अभ्यासक्रमात तृतीय भाषा म्हणून हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या या निर्णयाविरोधात राज्यभरात नाराजीचे वातावरण आहे. अनेक विरोधी राजकीय पक्ष एकत्र येऊन सरकारच्या या निर्णयाला विरोध करत आहेत.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, "हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही, परंतु पाचवीपासून हिदी असणे मुलांच्या हिताचं आहे. पहिली पासून हिदी सक्ती योग्य नाही. देशात ५५ टक्के लोक हिंदीचा आधार घेतात. परंतु मातृभाषा देखील महत्त्वाची आहे. सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीचा हट्ट करू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.
राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. याविरोधात देखील राज्यात शेतकरी नेते आक्रमक झाले आहेत. या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले की, "हा प्रश्न कसा सोडवायचा याचा विचार मी देखील विचार करत आहे. यावर शेतकरी नेते राजू शेट्टी आणि त्यांचे सहकारी यांची भूमिका काय आहे ते समजून घ्यायची आहे. सरकारचे जे म्हणणे आहे ते त्यांनी पटवून दिले तर त्यांची भूमिका समजून घेता येईल. जोपर्यंत हा प्रकल्प आणि त्याच्या दोन्ही बाजू समोर येत नाहीत तोपर्यंत याबाबत अधिक भाष्य करता येणार नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
इस्राईल सोबत भारताचे कधीच राजकीय संबंध नव्हते. मात्र भाजप सरकारने हे संबंध ठेवले. त्यामुळे आखाती देशांमध्ये भारताबद्दल गैरसमज निर्माण होत आहेत. जे काही अफगाणिस्तान आणि इस्राईल याबाबत निर्णय घेतले ते मी घेतले असं म्हणतात. सौदी, कतार याबाबत अमेरिकेची जी भूमिका आहे ती नाराजीची आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी मनमोहन सिंग यांनी कधीही इस्राईलशी राजकीय भूमिका घेतली नाही. आता ती भूमिका घेतली जातेय ती काही योग्य नाही.
इस्राईलला जाण्याचं माझं त्यावेळी ठरलं होतं. त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांचा मला फोन आला आणि म्हणाले की, मला या दौऱ्यात यायचं आहे. त्या शिष्टमंडळात माझा समावेश करा म्हणून फोन केला आहे. हे मी प्रधानमंत्री यांना सांगितलं आणि त्यांचा या शिष्टमंडळात समावेश केला होता की गोष्ट खरी आहे, असा किस्सा देखील शरद पवार यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितला.
ठाकरे बंधु एकत्र येण्यावर विचारले असता शरद पवार म्हणाले की, शिवसेना आणि मनसे एकत्र आले तर चांगलेच आहे. ते एकत्र येतील की नाही हे मला माहिती नाही, कारण हे एकत्र येण्यासाठी संजय राऊत प्रयत्न करत आहेत. पुढे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, यावर दोन्ही पक्ष एकत्र येऊन सगळे चांगलं काम केलं तर कधीही चांगलंच आहे. सगळे मतभेद विसरून चांगलं काम केलं तर वाईट वाटायचं कारण नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.