

Uddhav Thackeray on Hindi Compulsion
मुंबई : महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कुणी, कितीही प्रयत्न केला तरी महाराष्ट्रात हिंदी सक्ती लादू देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (दि.२६ जून) दिला. त्यांनी पत्रकार परिषद घेत, सर्वांनी पक्षभेद विसरुन हिंदी सक्तीविरोधातील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. जोपर्यंत ही सक्ती मागे घेतली जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हिंदी सगळ्यांना येते. आम्ही इतर भाषेचा द्वेष करत नाही. पण हिंदी सक्ती लादून घेणार नाही. आमचा हिंदी भाषेला विरोध नाही. पण हिंदी सक्तीला विरोध आहे. हे दळण कशासाठी दळताय? असा सवाल त्यांनी राज्य सरकारला केला.
हिंदी चित्रपटाला आम्ही जोपासले. हिंदीचे वावडे आम्हाला नाही. भाषिक आणीबाणीचा विरोध आम्ही करणार आहे. आम्ही कोणतीच सक्ती स्वीकारणार नाही. हिंदी सगळ्यांना येत असते. भय्या जोशी मुक्ताफळे उधळून गेले. आपला देश संघराज्य आहे. प्रत्येक भाषेनुसार प्रांत झाला आहे. मुख्यमंत्री असताना, मीच मराठी भाषा सक्तीची केली. मराठीच दालन करण्याचे मी ठरवले होते. तीदेखील जागा आता ही लोक बिल्डरच्या घशात घालत आहे. आता अजितदादा गप्प का आहेत? असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.
राज्यात कारण नसताना हिंदीची सक्ती केली जात आहे. भाजपचे हे एकाधिकारशाहीचे छुपे धोरण आहे. शिवसेना संपवून त्यांना हुकूमशाही आणायची आहे, असा आरोपही त्यांनी केला. सरकारच्या या सक्तीविरोधात मराठी माणसांनी, तमाम भाषा प्रेमी, विशेषतः मराठी चित्रपट सृष्टीतील लोकांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.
उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत मराठी अभ्यास क्रेंद्राचे प्रमुख दीपक पवार उपस्थित होते. हिंदी सक्तीविरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यापूर्वी २९ जून रोजी एक जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, पत्रकारांशी बोलताना हिंदी सक्तीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. हिंदी सक्ती नाही. मराठी सक्ती आहे. हिंदी ऑप्शनल आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरेंनी टोमणे मारण्यापेक्षा मराठी भाषेत जास्त अलंकार आहे. त्याचा वापर करावा, असा टोलाही लगावला.