

विशाळगड : शाहूवाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या वन्यप्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोठ्या कष्टाने, जिद्दीने आणि मशागतीवर हजारो रुपये खर्च करून पिकवलेल्या पिकांची जंगली जनावरे मोठ्या प्रमाणात नासाडी करत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यामुळे शेतीत केलेल्या कष्टावर पाणी फिरले असून, शेतकऱ्यांची स्वप्ने मातीमोल होत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात रानडुक्कर, गवे, आदी जंगली जनावरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यांनी उभ्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे. विशेषतः रताळी पिकांसह अन्य नगदी पिकांचा फडशा पाडला जात असल्यामुळे शेतीत केलेले सर्व श्रम वाया जात आहेत.
जंगल परिसरापासून जवळ असलेल्या शेतात वन्यप्राण्यांचे कळप रात्रीच्या वेळी येतात आणि उभी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकतात. यामुळे, हाता-तोंडाशी आलेल्या पिकांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या नुकसानीमुळे शेतीत केलेल्या गुंतवणुकीची भरपाई कशी करायची, या चिंतेत शेतकरी बुडाला आहे.
या गंभीर समस्येमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे धर्मसंकट उभे राहिले आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्ती आणि दुसरीकडे वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव यामुळे शेती व्यवसाय करणे अधिक कठीण बनले आहे. यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभाग आणि प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा, अशा घटनांमुळे शेतकऱ्यांचे जगणे अधिक कठीण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.