

Kolhapur drought aid:
बांबवडे : शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर-वारूण येथील दुष्काळ बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी पाच हजार रुपये अग्रिम मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नसल्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने जमा होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. मात्र अजूनही शेतकऱ्यांना ही मदत मिळाली नसल्यामुळे नेमक्या कोणत्या टप्प्यावर ती अडकली आहे? असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत देण्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ती त्रिस्तरीय समितीकडे सादर केली. या समितीनेही दिवाळीपूर्वीच फार्मर आयडी असलेले ५० आणि फार्मर आयडी नसलेले, मात्र आधार कार्ड असलेले २२९ अशा एकूण २७९ शेतकऱ्यांची यादी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केली. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता मदतीची रक्कम खात्यात जमा होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र प्रत्यक्षात पदरी पडली ती केवळ प्रतीक्षा!
विशेष म्हणजे, फार्मर आयडी असलेल्या ५० शेतकऱ्यांपैकी केवळ पाच जणांच्या खात्यावर मदत जमा झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मग उर्वरित ४५ शेतकऱ्यांची मदत का रखडली? दुसरीकडे, फार्मर आयडी नसला तरी आधार कार्डच्या आधारे पात्र बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे धोरण असताना उर्वरित २२९ शेतकऱ्यांच्या मदतीचे काय झाले? एकट्या शित्तूर-वारूण गावातील २७४ शेतकरी अद्याप या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. या मागचे नेमके गौड बंगाल काय? असा सवाल आता शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.