

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आमदार पी. एन. पाटील यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांचे चिरंजीव राजेश पाटील यांची निवड निश्चित आहे. सोमवारी (दि. 22) होणार्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
प्राथमिक कृषी पतपुरवठा, विकास सेवा सहकारी संस्था, संयुक्त शेती संस्था तसेच धान्य अधिकोष सहकारी संस्था करवीरमधून आ. पी. ए्न. पाटील जिल्हा बँकेवर संचालक म्हणून निवडून आले होते. त्यांचे आकस्मिक निधनामुळे हे पद रिक्त झाले होते. या रिक्त पदावर निवड करण्यासाठी जिल्हा बँकेच्या वतीने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांना पत्र पाठविले होते. त्यानुसार राज्य निवडणूक प्राधिकरणने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी अध्यासी अधिकारी म्हणून सहकारी संस्थांचे उपनिबंधक नीलकंठ खरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोमवारी जिल्हा बँकेच्या संचालकांची बैठक होत आहे. यामध्ये ही निवड होणार आहे. त्यासाठी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची वेळ आहे. दुपारी एक ते दीड माघारीसाठी वेळ आहे. त्यानंतर निवड जाहीर होईल.
आमादार पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी मेळावा घेऊन त्यांच्या गटाच्या नेतृत्वाबाबत चर्चा केली होती. यावेळी विधानसभेसाठी राहुल पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी राजेश पाटील असे ठरविण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा बँकेच्या संचालकपदी राजेश पाटील यांच्या नावावर सोमवारी होणार्या संचालकांच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.