.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
धुळे वृत्तसेवा : धुळे जिल्हा परिषदेच्या साफसफाईच्या ई-निविदेचे टेंडर रद्द झाल्याच्या कारणावरून बांधकाम विभागातील कर्मचारी पंकज वाघ आणि संबंधित ठेकेदाराचे भाऊ किशोर शिंदे यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या संदर्भात वाघ यांच्या वतीने जिल्हा परिषद कर्मचारी युनियन आणि शिंदे यांनी स्वतंत्रपणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले असून कारवाईची मागणी केली आहे. तर खोटा गुन्हा दाखल केल्या प्रकरणात कारवाई न झाल्यास परिवारासह उपोषण करण्याचा इशारा शिंदे यांनी दिला आहे.
धुळे येथील जिल्हा परिषदेच्या साफसफाईसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. यात पाच जणांनी निविदा भरली. मात्र तांत्रिक दृष्ट्या दोन निविदाधारक पात्र ठरले. तर तीन अपात्र झाले. यापैकी सावित्रीबाई सेवाभावी संस्था आणि सावित्रीबाई प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही संस्थांचे एकच चेअरमन आहेत. निविदा अपात्र झाल्याने चेअरमनचे भाऊ किशोर शिंदे यांनी घरी येऊन मारहाण केल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील जोडारी पंकज वाघ यांनी केली आहे. शिंदे यांनी भ्रमणध्वनीवरून शिवीगाळ केली. त्याचप्रमाणे घरी येऊन आपल्या परिवारातील सदस्यांना देखील मारहाण केली. या मारहाणीत आपण गंभीर दुखापती झालो असल्याचा आरोप देखील वाघ यांनी केला आहे. त्याच प्रमाणे निविदा प्रक्रियेमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न देखील शिंदे यांनी केला आहे. असा आरोप वाघ यांनी केला. या प्रकरणात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने या प्रकरणाची गंभीर दखल मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी घ्यावी, अशी मागणी करत निदर्शने केली आहेत.
दरम्यान याच प्रकरणात किशोर शिंदे यांनी देखील धुळे शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी नरवडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करून या घटनेची माहिती दिली. या ई निविदा प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना वाघ यांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांनी भ्रमणध्वनीवरून आपणास असभ्य भाषा वापरली. त्याच प्रमाणे घरी बोलवून काही सहकाऱ्यांच्या मदतीने बेदम मारहाण केली. वाघ यांनी भ्रमणध्वनी वरून संबंधित टेंडर तुमच्या भरोशाने भरले होते. मात्र ते आता संस्कृती एजन्सीला देण्यात येणार आहे. यासाठी त्यांनी दोन अधिकाऱ्यांची नावे घेतली आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, ही कारवाई न झाल्यास जिल्हा परिषदेच्या दालना समोर परिवारासह आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी शिंदे यांनी दिला आहे.