

Satej Patil on Shaktipeeth Highway
कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाविरोधात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी दंड थोपटले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी शक्तिपीठ महामार्ग रद्द, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली होती आणि तसे त्यांनी सर्वांसमोर जाहीर केलं होतं. केवळ मतांसाठी ही घोषणा होती का? असा जनतेला प्रश्न पडला आहे. हा गरज नसलेला महामार्ग आहे. मी याबाबत सातत्याने आवाज उठवत आहे. शेतकऱ्यांच्या माथी हा महामार्ग लादू नका, असा विनंतीवजा इशारा सतेज पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. ते आज कोल्हापुरात बोलत होते.
''निवडणुकीच्या आधी कोल्हापूर जिल्ह्यातील अधिसूचना रद्द झाली. ती पुन्हा एकदा काढली आहे. तीच अलाइनमेंट ठेवून हा रस्ता पुढे जाणार आहे. चार टप्प्यात हा रस्ता आहे. त्यातील तीन रस्त्यांची प्रक्रिया पूर्ण झाली. चौथा टप्पा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून शासनाला शक्य होणार नाही. हा केवळ कोल्हापूर जिल्ह्याचा प्रश्न नाही. तर बारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री प्रकाश आबिटकर मंत्रिमंडळात काय बोलले माहिती नाही?, त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत या महामार्गाबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यांचीसुद्धा भूमिका स्पष्ट होणं गरजेचं आहे. याबाबत राज्यातल्या महायुतीतील इतर दोन्ही पक्षांची हतबलता दिसून येत आहे '' असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांची यासंदर्भात ऑनलाईन बैठक आज होईल. त्यानंतर पुढची रणनिती या संदर्भात आम्ही ठरवणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
महायुतीतील नाराजीनाट्यावर बोलताना ते म्हणाले की, महायुती नैसर्गिक युती नाही. आऊट ऑफ कंपल्शन झालेली ही युती आहे. त्यामुळे हे अलबेल असल्याचे यावरून दिसून येत आहे.
कोल्हापूर हद्दवाढीवरही त्यांनी भाष्य केले. सत्ताधाऱ्यांनी हद्दवाढी संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे. त्यांनी त्यांची भूमिका आणि निर्णय घेतल्याशिवाय आम्ही काय बोलणार? असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, शक्तीपीठ महामार्गाविरोधात आवाज उठविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी गुरुवारी सकाळी धाराशिवकडे रवाना झाले. याबाबत सक्तीने सुरू असलेल्या मोजण्या आणि पोलिसांच्या गुंडगिरीला जशास तसे उत्तर देणार, असा पवित्रा शेट्टी यांनी घेतला आहे. बार्शी (सोलापूर) येथील शेळगाव गावात स्वत: हजर राहून राजू शेट्टी सक्तीच्या भुसंपादन मोजणीस विरोध करणार आहेत. यासाठी पर्यायी रत्नागिरी -नागपूर महामार्ग असताना याच मार्गाला समांतर शक्तीपीठचा अट्टाहास कशासाठी? असा सवाल शेट्टी यांनी केला आहे.
दरम्यान, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना त्यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त कोल्हापूरमध्ये अभिवादन करण्यात आले. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळावर खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, ऋतुराज पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केले.