

सांगली : नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गाला बाधित शेतकर्यांनी तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे सरकारने आता हा महामार्ग पूर्ण करण्यासाठी पोलिस बंदोबस्तात मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. 25 जून ते 10 ऑगस्ट यादरम्यान ही मोजणी करण्यात येणार आहे. दरम्यान, सरकारने हुकूमशाही पद्धतीने मोजणी करण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडण्यात येईल, असा इशारा महामार्ग शेती बचाव कृती समितीने दिला आहे.
याबाबत कृती समितीचे समन्वयक उमेश देशमुख म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचे आश्वासन विधानसभा निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्या आश्वासनाला हरताळ फासत सरकारने पोलिस बंदोबस्तासह जमिनीच्या मोजणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. याला महाराष्ट्रातील शेतकरी जोरदार प्रतिकार करतील आणि मोजणी बंद पाडतील. तसा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर सांगली जिल्ह्यातील शेतकरी ठाम आहेत.
या अगोदर संवाददूत म्हणून आलेल्या अधिकर्यांना शेतकर्यांनी हाकलून लावले. त्यानंतर कोणतेही अधिकारी गावात आल्यास त्यांना काळे फासून धिंड काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर कोणीही अधिकारी गावात आलेले नाहीत. शेतकर्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी गावोगावी मोजणी करताना पोलिस बंदोबस्त पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज तालुक्यांतील सर्वच गावांतील शेतकर्यांनी एकत्र येत आपल्या गावात संवाददूत म्हणून आलेल्या अधिकार्यांना अक्षरशः पळवून लावले. कोणताही संवाद न करता अधिकार्यांना आल्या पावली परत फिरावे लागले. कोणाचेतरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार शक्तिपीठचा घाट घालत आहे. सांगली जिल्ह्यातील शेतकरी अशी हुकूमशाही प्रवृत्ती चालू देणार नाहीत. आताही जबरदस्तीने मोजणी करण्याचा प्रयत्न शेतकरी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत.
शक्तिपीठमुळे शेतकर्यांचे, शेतीचे आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार आहे. सांगली परिसरातील गावांना महापुराचा धोका वाढणार आहे. शेतकर्यांच्या पुढील अनेक पिढ्यांचे नुकसान होणार आहे. हे सरकारला अनेकदा सांगूनदेखील मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार हट्ट सोडायला तयार नाही. म्हणून आमची लढाई आमच्या गावात आणि शेतात राहील. त्यामुळे दि. 25 जूनपासून सुरू होणारी मोजणी सरकारने स्थगित करावी, अन्यथा संघर्ष अटळ आहे. यावेळी महेश खराडे, सतीश साखळकर, प्रभाकर तोडकर, उमेश एडके, प्रवीण पाटील, सुनील पवार, यशवंत हारुगडे, सुधाकर पाटील, विष्णू पाटील, आदी उपस्थित होते.