

जयसिंगपूर : जैनापूर (ता.शिरोळ) येथील सरपंच संगीता कांबळे यांच्यावर १३ मे रोजी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आल्याने त्याचे सरपंचपद रद्द झाले होते. शुक्रवारी सरपंच निवडीसाठी विशेष सभा बोलवण्यात आली होती. मात्र कोरम अभावी सभा तहकुब झाल्याने शनिवारी निवडीसाठी तहकूब सभा घेण्यात आली. यात ६ सदस्यापैकी आरक्षित जागेवरील सरपंच उमेदवार संगीता रमेश कांबळे या एकमेव उपस्थित राहिल्याने पुन्हा सरपंच पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. ही कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव घटना आहे.
जैनापुर ग्रामपंचायत एकूण सदस्य संख्या ९ आहे. त्यापैकी २ सदस्य अपात्र झाले आहेत. तर १ सदस्य मयत आहेत. सरपंच १ व ५ सदस्य असे एकूण ६ सदस्य पदावर कार्यरत आहेत. सरपंच पद हे अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. विविध प्रश्नावरून सरपंच संगीता कांबळे यांच्यावर १३ मे रोजी तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या अध्यक्षेखाली अविश्वास ठराव मंजूर झाला होता. त्यामुळे सरपंचपद रिक्त होते.
शुक्रवारी ग्रामपंचायत सरपंच निवडीसाठी विशेष सभा बोलवण्यात आले होती. विरोधी ५ सदस्यांकडे अनुसूचित जाती महिला उमेदवार नसल्याने माजी सरपंच व विद्यमान सदस्या संगीता कांबळे यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र सदस्याने या निवडीकडे पाठ फिरवल्याने ही सभा तहकूब करण्यात आली होती. त्यामुळे शनिवारी दुपारी सभा घेण्यात आली. यातही ५ सदस्यांनी पाठ फिरवल्याने अविश्वास ठराव आलेल्या संगीता कांबळे या पुन्हा बिनविरोध सरपंच म्हणून निवडून आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जयसिंगपूर मंडळ अधिकारी राहुल कोळी यांनी काम पाहिले. निवडीनंतर समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण करून आनंद साजरा केला. यावेळी योगेश कांबळे, योगीराज कोळी, आनंदा कोळी, राहुल पाटील, अनिल पाटील, निकेत कांबळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते .
माझ्यावर विनाकारण राजकीय द्वेषातून बिनबुडाचे आरोप करण्यात आले होते. यातून अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे मला सरपंच पदावरून अपात्र करण्यात आले. पण आज पुन्हा दीड महिन्यांनी माझी सरपंचपदी निवड झाली. हा संविधानाचा सन्मान असुन मला न्याय मिळाला. सरपंच पदाच्या काळात गावच्या विकासासाठी जास्तीत जास्त विकास कामे करणार आहे.
-संगीता कांबळे, नूतन सरपंच जैनापुर