

Kolhapur Bhudargad News
कडगाव (जि. कोल्हापूर) : भुदरगड तालुक्यातील सोनारवाडी गावाजवळील चोपडेवाडी डोंगरात पुन्हा एकदा मोठ्या भेगा पडल्याचे दिसून आले आहे. या घटनेमुळे गारगोटी ते फणसवाडी, पुष्पनगर, मडुर, शेळोली, वेंगरूळ, मेघोली, सोनुर्ली, पडखंबे, वर्पेवाडी या मार्गांवरील वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभाग भुदरगड यांच्यातर्फे रस्ता प्रजिमा ५२ (किमी ५/४००) हा वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.
यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भागात पूर्वीही २०१९ साली अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले होते. त्यावेळी घावरेवाडी-चोपडेवाडी फाट्यावर रस्ता पूर्णपणे खचला होता आणि अनेक दिवस वाहतूक बंद होती.
यंदाही या भागात संततधार पावसामुळे जमिनीत भेघा पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेबाबत खबरदारी म्हणून हा रस्ता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग भुदरगड यांच्याकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी पर्यायी मार्ग म्हणजेच गारगोटी, आकुर्डे, करडवाडी, कडगाव, ममदापूर (राज्यमार्ग क्र. १७९) याचा वापर करावा.
सात वर्षांपूर्वी येथील रस्त्याला लागून असलेल्या जमीनधारकाने डोंगरातील जमीन बसविताना वरून नैसर्गिक स्त्रोत म्हणून येणाऱ्या पाण्याचा मार्ग बदलला होता. त्यानंतर दोनवेळा गारगोटी ते वेंगरूळ रस्त्यावरील घावरेवाडी- चोपडेवाडी पाटीजवळ रस्ता खचला आहे, असे काही नागरिकांनी म्हणणे आहे.