

Kale Subdivision Agricultural Power Supply
रवींद्र पाटील
कळे : महावितरणच्या कळे उपविभागांतर्गत येणाऱ्या कळे, वेतवडे, पडळ, बाजार भोगाव आणि पाटपन्हाळा या उपकेंद्रांमधील तब्बल ७,१०० शेतीपंप वीजग्राहकांना १०० टक्के दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना दिवसा चांगल्या दाबाने वीज मिळत आहे. या सुविधेमुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
कळे उपविभागातील बहुतांश परिसर दुर्गम, डोंगराळ आणि वनक्षेत्रालगतचा आहे. या भागात वन्यप्राण्यांचा वावर असल्याने रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, आता दिवसा वीज उपलब्ध झाल्यामुळे सिंचनाचे नियोजन करणे अधिक सोयीचे झाले आहे. परिणामी, शेतीच्या कामांचे व्यवस्थापन सुलभ होण्यास मदत होत आहे.
महावितरणच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत परखंदळे येथे ५ मेगावॅट क्षमतेचा, तर पेंडाखळे येथे ७ मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. पडळ येथे ५ मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पांमुळे कृषी वीजपुरवठ्यासाठी सौरऊर्जेचा वापर वाढत असून, वीजपुरवठ्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होत आहे.
याशिवाय, योजनेअंतर्गत वेतवडे आणि पडळ उपकेंद्रांतील प्रत्येकी ५ एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवून ती १० एमव्हीए करण्यात आली आहे. त्यामुळे वीज वितरण व्यवस्थेची क्षमता वाढली असून, कृषी वीजपुरवठ्याची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा अधिक सक्षम झाल्या आहेत.
कळे उपकेंद्रात शेती वाहिनी आणि गावठाण फीडरसाठी स्वतंत्र सर्किट ब्रेकर बसविण्याचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे शेतीपंप आणि गावठाणाचा वीजपुरवठा स्वतंत्रपणे नियंत्रित करणे शक्य होणार आहे. देखभाल-दुरुस्तीच्या कामांदरम्यान तसेच तांत्रिक बिघाड झाल्यास वीजपुरवठ्याचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजनेअंतर्गत ही कामे महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता गणपत लटपटे आणि कार्यकारी अभियंता अजित अस्वले यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच उपकार्यकारी अभियंता दयानंद कमतगी यांच्या पुढाकारातून पूर्ण करण्यात आली.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे पारंपरिक वीजपुरवठ्यावरील ताण कमी करण्यास, कृषी वीजपुरवठा अधिक सक्षम करण्यास आणि दुर्गम भागातील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यास महत्त्वपूर्ण मदत होत आहे. कळे उपविभागातील या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, शेतीच्या सिंचन व्यवस्थेला अधिक चालना मिळणार आहे.
- दयानंद कमतगी, उपकार्यकारी अभियंता, महावितरण