कोल्‍हापूर : शेतकऱ्यांच्या प्रबळ मानसिकतेपुढे निगरगट्ट सरकार खचले : राजू शेट्टी

राजू शेट्टी
राजू शेट्टी
Published on
Updated on

सरूड : पुढारी वृत्तसेवा यंदा ऊसदर आंदोलनाच्या माध्यमातून सरकार बरोबर वेगवेगळ्या टप्प्यावर दीर्घकाळ लढा द्यावा लागला. फलस्वरूप १५ लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास दीड हजार कोटी रुपयांचा लाभ झाला असे प्रतिपादन स्वाभिमानीचे मा. खा. राजू शेट्टी यांनी सरुड (ता. शाहूवाडी) येथे ग्रामपंचायत व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या वतीने आयोजित नागरी सत्काराला उत्तर देताना केले. आंदोलनाच्या यशाबद्दल कार्यकर्त्यांसह अनेकांना साशंकता वाटत होती. मात्र, अखेरपर्यंत न डगमगता दिलेल्या लढ्यात शेतकऱ्यांच्या प्रबळ मानसिकतेपुढे निगरगट्ट सरकार खचले, हेच या चळवळीच्या यशाचे गमक असल्याचे त्यांनी सांगितले. सरूडकरांनी नागरी सत्काराचे आयोजन करून शेतकऱ्यांच्या चळवळीला हत्तीचे बळ दिल्याचे त्यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले.

सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी शेकापचे भाई भारत पाटील होते. चळवळी शिवाय समाजघटकांचा कोणताही प्रश्न सुटू शकत नाही. यासाठी चळवळीला दोष किंवा नांवे न ठेवता प्रत्येक चळवळीचा भाग बना, असे आवाहन भाई राजाराम मगदूम यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात केले.

यावेळी सरूडचे लोकनियुक्त सरपंच भगवान नांगरे व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांच्या हस्ते राजू शेट्टी यांचा कोल्हापुरी फेटा, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन नागरी सत्कार करण्यात आला.

मा. खा. शेट्टी म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकार मूठभर धनिकांच्या भल्यासाठी धोरणे आखत असल्याने यात शेतकरीवर्ग भरडला जातोय. सरकारने आयात-निर्यातीत योग्य प्रकारे हस्तक्षेप केला असता तर आज साखरेचा बाजारभाव ७० रुपयाच्या पलीकडे गेला असता असे उदाहरणादाखल सांगितले. धरण प्रकल्पात जमिनी गेलेल्या धरणग्रस्तांना बदल्यात लाभ क्षेत्रातील शेतकाऱ्यांनी जमिनी दिल्या. मग पाणीपट्टीत सुलतानी पद्धतीने दहापट वाढ करण्याचे अधिकार सरकारला कोणी दिले ? असा रोकडा सवालही त्यांनी उपस्थित केला.

यावेळी भाई भारत पाटील यांनी उसदराच्या आंदोलनातील प्रस्थापित साखर कारखानदार आणि सरकारने आणलेले अडथळे याचा उहापोह करीत राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी शेतकऱ्यांनी तब्बल नऊ तास राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्याचा इतिहास केल्याचे सांगितले. दरम्यान, गतवेळी केलेली चूक सुधारून शेतकऱ्यांसाठी अहोरात्र लढणाऱ्या राजू शेट्टी यांना पुन्हा संसदेत पाठवूया, या सत्कार समारंभाचे आयोजक सरपंच भगवान नांगरे यांनी केलेल्या आवाहनाला उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष सागर संभुशेटे, गणेश महाजन, सरुडचे तंटामुक्त अध्यक्ष बाबासो पाटील, माजी सरपंच उत्तम पाटील, सत्कार कृती समितीचे मनीष तडवळेकर, शामराव सोमोशी, शरद पाटील, अशोक पाडळकर, सचिन पाटील आदींसह पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

…तर त्यांची गाठ स्वाभिमानीशी असेल!

दरम्यान साखर कारखान्यांच्या सदोष वजनकाट्यांच्या प्रश्नाबाबत साखर आयुक्तांकडे स्वाभिमानाचा पाठपुरावा सुरू असून, शेतकऱ्यांनी पर्यायी वजनकाट्यांवरून ऊसाचे वजन करून संबंधित कारखान्यांकडे पाठवावा, भीती बाळगण्याची गरज नाही. कारण असा येणारा ऊस नाकारण्याचा अधिकार कारखान्यांना नाही. त्यातूनही कारखानदारांनी आगळीक केल्यास तसे मला कळवा. मग मात्र त्यांची गाठ स्वाभिमानीशी असेल, असा गर्भित इशाराच राजू शेट्टींनी कारखानदारांना उद्देशून दिला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news