

माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल पंधरा वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असलेल्या 2012 च्या ऊस आंदोलनातील 302 आणि 307 सारख्या कलमांचा समावेश असलेल्या गंभीर गुन्ह्यांतून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. या प्रकरणात शेट्टी यांच्यासह एकूण 80 आंदोलनकर्त्यांची मुक्तता करण्यात आली असून, ऊस आंदोलनानंतर जवळपास दीड दशकांनी हा निकाल लागल्यामुळे शेतकरी संघटनांमध्येही समाधानाचा भाव व्यक्त केला जात आहे.
२०११ साली शिरोली येथे ऊसदरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोठं आंदोलन छेडलं होतं. साखर कारखानदार आणि शासनाकडून अपेक्षित दर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता आणि त्या असंतोषाचे रुपांतर मोठ्या आंदोलनात झाले होते.
या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला होता आणि परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. याच वेळी झालेल्या धावपळीत एका पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या मृत्यूची जबाबदारी आंदोलनकर्त्यांवर टाकत पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केले होते. त्या काळात आंदोलन एवढे हिंसक झाले होते की प्रशासनालाही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा ताण जाणवत होता.
शेतकऱ्यांचा रोष, लाठीचार्ज, रस्ते रोको, धक्काबुक्की, आणि पोलिसांसोबत झालेले संघर्ष अशा सर्व गोष्टींमुळे या प्रकरणाला त्या वेळी राज्यभरात मोठ्या चर्चेत होता. शेतकरी मागण्यांवर तोडगा निघत नसल्यामुळे तणाव वाढत गेला आणि हा वाद न्यायालयीन मार्गाने अनेक वर्षे सुरू राहिला.
राज्यातील शेतकरी चळवळींमध्ये ऊस आंदोलनाला ऐतिहासिक स्थान आहे. ऊसदरवाढीसाठी झालेली ही लढाई अनेक वर्षे गाजत राहिली. हे प्रकरण राजकीय दृष्ट्याही महत्त्वाचे मानले जात होते. आता न्यायालयाच्या निर्णयानंतर शेट्टी यांची राजकीय प्रतिमा पुन्हा अधिक मजबूत झाल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या मुक्ततेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्येही जल्लोषाचे वातावरण आहे.