

प्रा. सुनील डेळेकर
मुरगूड : मुरगूड नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मतदानासाठी तीन दिवस राहिल्याने उमेदवारांसह नेत्यांची व कार्यकर्त्यांची कसोटी लागली आहे. मतदारांना वश करण्यासाठी शेवटच्या टप्प्यात प्रलोभनांना (ऑफरना) ऊत येऊ लागला आहे.
पालिका निवडणूक दुरंगी, अटीतटीची आणि प्रामुख्याने मंत्री विरुद्ध माजी खासदार अशीच होत आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीचे गणित बाजूला ठेवून शिवसेना (शिंदे गटास) अर्थात माजी खासदार संजय मंडलिक यांना विरोध करीत समरजित घाटगे यांच्या शाहू आघाडीशी जुळवून घेत सत्ताधारी मंडलिक गटासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
मंडलिक व प्रवीण पाटील यांनी युती करून मुश्रीफांनाही प्रतिआव्हान दिले. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले मंत्री मुश्रीफ व समरजित घाटगे या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत; पण त्यांची ही युती मतदारांच्या किती पचनी पडते, याची ही परीक्षाच आहे, तरीदेखील प्रचाराच्या रणधुमाळीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. घर टू घर प्रचारावर भर दिला जात असून, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून होत आहे.
खर्चाच्या मर्यादेमुळे जेवणावळींवर निर्बंध आल्याने काही उमेदवारांनी शहराबाहेरच्या हॉटेलचे पास मतदारांपर्यंत पोहोचवले आहेत. काही उमेदवारांनी मिसळ पे चर्चाचे नियोजन केले आहे. बहुतांश प्रभागात तुल्यबळ लढती असल्यामुळे साम, दाम, दंड, भेद नीती वापरून प्रचार सुरू आहे. पदयात्रा व कोपरा सभांमुळे प्रचारातील रंगत वाढली आहे. कागलपेक्षा मुरगूडला राजकीय ईर्ष्या टोकाला जात असल्याचे दिसत आहे.
ऑफरचा धडाका
निवडणूक जसजशी जवळ येईल तसा मतदारांचा भाव वधारत आहे. उमेदवार व मतदार एकमेकांचे सावज होऊ पाहत आहेत. त्यातून प्रलोभने दाखवून वेगवेगळ्या ऑफर दिल्या जात आहेत. जिथे काटा लढत आहे, तिथे तुमच्यासाठी वाट्टेल ते अशा पद्धतीने ऑफर मिळत आहेत. सोन्याच्या अंगठ्या, चांदीचे पैंजण, जोडवी व मोटारसायकल अशा ऑफरसुद्धा मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.