

कोल्हापूर: ( प्रतिनिधी)
"राज्य सरकारने अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या नावाखाली राज्यातील तमाम शेतकऱ्यांची क्रूर माकडचेष्टा चालवली असून, ही शुद्ध फसवणूक आहे," असा घणाघाती आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. 'सात-बारा कोरा' करण्याच्या मोठ्या गप्पा मारणारे नेते आता शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
सात-बारा कोरा'च्या दाव्याचा फुगा फुटला देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला राज्यातील शेतकऱ्यांचा सात-बारा पूर्णपणे कोरा करण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात थकीत कर्जदारांना केवळ २ लाख रुपये आणि नियमित कर्ज भरणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना अवघे ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले. हा राज्यातील कोट्यवधी कर्जदार शेतकऱ्यांचा मोठा विश्वासघात आहे.
गेल्या आठ महिन्यांत राज्य सरकारने जिल्हा बँका आणि विविध कार्यकारी विकास सोसायट्यांकडून तब्बल ११ वेळा शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती गोळा केली. एवढी छाननी करूनही आठ महिन्यांनंतर पहिल्या दिवशी केवळ ५०० शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. एवढ्या संथ गतीने काम करून सरकारला कर्जमाफी द्यायची आहे की टाळाटाळ करायची आहे, असा संतप्त सवाल शेट्टी यांनी विचारला.
राज्य सरकारच्या तिजोरीत शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसेच शिल्लक राहिलेले नाहीत. केवळ योजनांच्या जाहिराती करून वेळ मारून नेण्याचे काम सुरू आहे. पैशांअभावीच सरकार अशा प्रकारे वारंवार याद्या लांबवून आणि माहिती मागवून चालढकल करत आहे, हे आता उघड झाले आहे.
आज राज्यातील शेतकरी कमालीच्या आर्थिक संकटात सापडला आहे. एकीकडे लांबलेला पाऊस, दुसरीकडे खतांचे गगनाला भिडलेले दर आणि बाजारपेठेतील प्रचंड महागाई यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने सरसकट कर्जमाफी देऊन दिलासा देणे गरजेचे असताना सरकार मात्र वेळकाढूपणा करत आहे.
"सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये. जर ही प्रशासकीय चालढकल थांबवून तातडीने सर्व पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी जाहीर करून बँक खात्यात पैसे जमा केले नाहीत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण राज्यात सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन छेडेल," असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.