

पंढरपूर : महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेल्या नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यातील सुपीक शेतजमीन, बागायती क्षेत्र आणि शेतकऱ्यांची घरे उद्ध्वस्त होणार आहेत. या विनाशकारी महामार्गाला राज्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. हा प्रकल्प पूर्णपणे रद्द करावा या मागणीसाठी आता आंदोलनाचा पुढील टप्पा जाहीर करण्यात आला आहे.
आगामी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील १३ जिल्ह्यांतील बाधित शेतकरी एकत्र आले आहेत. शनिवार दि. १८ जुलै रोजी पंढरपूर येथील वाखरी पालखी तळ येथे सकाळी ११ वाजता शेतकऱ्यांची सभा होणार आहे. यानंतर वाखरी ते विठ्ठल मंदिर, पंढरपूर अशी हजारो शेतकऱ्यांची भव्य पायी सदबुध्दी यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्यावतीने माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपुरात येणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, १३ जिल्ह्यांतील शेतकरी पंढरपुरात विठ्ठल चरणी एकत्र येत आहेत. “शेतकऱ्यांची सुपीक जमीन हिरावून घेणारा हा शक्तीपीठ महामार्ग राज्य सरकारने त्वरित रद्द करावा आणि मुख्यमंत्री महोदयांना हा विनाशकारी प्रकल्प रद्द करण्याची सुबुद्धी पांडुरंगाने द्यावी,” अशी सामूहिक मागणी आणि प्रार्थना या सदबुध्दी यात्रेच्या माध्यमातून शेतकरी विठूरायाकडे करणार आहेत.
१३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
शक्तीपीठ महामार्गामुळे १३ जिल्ह्यांतील हजारो हेक्टर शेतजमीन संपादित केली जाणार आहे. यामु लाखो शेतकऱ्यांवर भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. या महामार्गाची कोणतीही आवश्यकता नसताना देवेंद्र फडणवीस यांना ५० हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठी व केवळ कंत्राटदार आणि भांडवलदारांच्या फायद्यासाठी हा प्रकल्प शेतकऱ्यांवर लादला जात असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.