[author title="राम यादव, इतिहास अभ्यासक, कोल्हापूर" image="http://"][/author]
श्री राजा शिवछत्रपती यांच्या दरबारातील कवींद्र परमानंद यांनी खुद्द शिवरायांच्या सांगण्यावरून जो ग्रंथ लिहिला त्यात राजमाता जिजाबाईसाहेब यांना शिवजन्मापूर्वी लागलेल्या डोहाळ्यांचे वर्णन केले आहे. हे वर्णन म्हणजेच जिजाऊंच्या जीवनाचे अंतिम ध्येय होते आणि ते जिजाऊंनी आपल्या पुत्राकडून म्हणजेच शिवरायांकडून पूर्णत्वास नेले.
कवींद्र परमानंद यांनी केलेले जिजाऊंच्या डोहाळ्यांच्या वर्णन "हत्तीवर, वाघांवर आणि गडांवर आरोहण करावें, शुभ्र छत्रा-खाली सुवर्ण सिंहासनावर स्थिर बसावें, झेंडा उंच उभारावा, सुंदर चौऱ्या ढाळून घ्याव्या, दुंदुभिध्वनि ऐकावा, धनुष्यबाण, भाला, तलवार आणि चिलखत हीं धारण करून लढाया कराव्या, गड हस्तगत करावे, विजयश्री मिळवावी, मोठमोठी दाने करावी, धर्मस्थापना करावी, असे अनेक प्रकारचे डोहाळे तिला प्रतिदिनी होऊ लागले".
राजमाता जिजाऊ यांनी आपली स्वतंत्र मराठा साम्राज्याची स्थापना करून आपल्या पुत्रास सिंहासनाधिश्वर श्री राजा शिवछत्रपती करण्याची संकल्पना पूर्णत्वास नेली आणि मगच आपला देह त्याग केला. जिजाऊ या पराक्रमी घराण्यातील लखुजीराजे जाधव यांच्या कन्या, लहानपणापासून अत्यंत चाणाक्ष बुद्धीच्या जिजाऊंना सर्वांगीण शिक्षण देण्याचे कार्य त्यांचे वडील लखुजीराजे जाधवराव यांनी दिलं. जिजाऊंचा विवाह भोसले घराण्यातील पराक्रमी महाराजा शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. शहाजीराजे हे पराक्रमी होतेच शिवाय दिल्लीतील मोगली आक्रमणापासून दक्षिणेतील सगळ्या पातशहाना वाचवण्याचे काम शहाजीराजांनीच केलं. स्वतः शहाजीराजे आणि जिजाऊंचे स्वप्न होते की महाराष्ट्रात मराठ्यांचे स्वतःचे स्वतंत्र स्वराज्य स्थापन करावे. परकियांपासून रयतेच रक्षण करावे, एक असे राज्य निर्माण करावे जिथं कोणत्याही प्रकारचा अन्याय अत्याचार होणार नाही. (शिवभारत ग्रंथात जिजाऊंना धर्म स्थापनेचे आणि नवं राज्य निर्मितीचे डोहाळे लागल्याचा उल्लेख आहे.)
वरील स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने शहाजी राजांनी जिजाऊ आणि बाळ शिवराय यांना पुण्याच्या आपल्या जहागिरीत कारभार पाहण्यासाठी पाठवले. त्यांच्या बरोबर हुशार कारभारी, पराक्रमी सेनानी, हुशार गुप्तहेर दिले. जिजाऊंनी नव्या स्वराज्य निर्मितीच आपल काम सुरू केलं. रयतेला सर्व प्रकारची मदत मिळू लागली. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक वस्तू बिनव्याजी मिळू लागल्या. शेतीसाठी जनावरे मिळू लागली. बारा बलुतेदारांना काम मिळू लागली. जे पुणे परकियांनी उध्वस्त केलं होत, ते पुणे जिजाऊंनी पुन्हा सुजलाम सुफलाम असे वसवले. पुण्यावर परकियांनी गाढवाचा नांगर फिरवला होता. तिथं जिजाऊनी सोन्याचा नांगर फिरवला आणि शेतीला नवसंजीवनी दिली.
बाळ शिरायांना सर्व प्रकारचे शिक्षण जिजाऊंनी दिले, ज्यामध्ये लिहिणे, वाचणे अनेक भाषा, युद्धकला, किल्ला बांधण्याचे तंत्र, गनिमीकावा युद्ध कसे करावे, शत्रुची गुपित माहिती कशी काढावी, मल्लविद्या, विष प्रयोगावर तोडगा कसा काढावा, अशा अनेक विद्या जिजाऊंनी शिवरायांना शिकवल्या. जिजाऊंच्या आज्ञेने पराक्रमी पुत्र शिवरायांनी स्वराज्य निर्मितीच्या कार्याला सुरवात केली. राज्य निर्मितीच्या कार्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांना एकत्र करून स्वराज्य कार्याची प्रेरणा देणे, त्यांना स्वराज्याच्या कार्यात योग्य ठिकाणी नेमणूक करणे, त्यांच्या पराक्रमी कार्याची दखल घेऊन त्यांना योग्य बक्षीस देणे, कामात कुचराई करणाऱ्या व्यक्तींना कडक शासन करणे, नवंनवे प्रदेश, किल्ले जिंकणे, त्या प्रदेशाची किल्ल्यांची मजबुती करून त्यावर सक्षम अधिकारी नेमणे, याप्रकारे स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार होऊ लागली.
ज्यावेळी अफजखान सारखा मातब्बर आदिलशाही सरदार स्वराज्यावर चालून आला तेव्हा जिजाऊंनी शिवरायांना स्वतः सांगितले होते की मोठ्या भावाच्या घातपाती मृत्यूचे उट्टे काढणे (बदला घेणे). सिध्दी जोहरच्या वेढ्यातून महाराज अडकले असता जिजाऊ स्वतः आपली १० हजाराची फौज घेऊन शिवरायांना सोडवण्यासाठी राजगडावरून निघाल्या होत्या. पण त्या प्रसंगी सेनापती नेताजी पालकर यांनी जिजाऊंना विनवणी करून स्वतः सेनापती आणि सिद्दी हिलाल हे महाराजांना सोडवण्यासाठी पन्हाळगडी निघाले. महाराज आग्राच्या कैदेत असताना स्वराज्याचा कारभार स्वतः जिजाऊंनी सांभाळला त्याकाळात स्वराज्याचा एक इंच जागाही शत्रूला जिंकता आला नाही. उलट रांगणा किल्ल्यासारखा महत्वाचा किल्ला जिजाऊंनी आदिलशाहीकडून जिंकून घेतला. जिजाऊ कारभार पाहताना स्वतःचा शिककामोर्तब वापरत त्यांचा शिक्का होता "वालिदा ए शिवाजी" म्हणजे शिवरायांची आई.
जिजाऊ या दूरदृष्टीच्या पराक्रमी, नेतृत्व करण्यात वाकबगार, हुशार, शांत बुद्धीने विचार पूर्वक निर्णय घेणाऱ्या आणि महत्वाचे म्हणजे स्वतंत्र स्वराज्याची प्रखर इच्छा ठेवणाऱ्या होत्या. म्हणूनच त्यांनी शिवरायांना स्वतः राज्याभिषेक करून स्वतंत्र स्वराज्याची स्थापना करण्याची आज्ञा दिली. स्वतंत्र स्वराज्याची ही राजमाता जिजाऊंची महत्वाकांक्षा ६ जून १६७४ साली श्री शिवछत्रपतींनी पूर्ण केली. भारतभूमी शेकडो वर्षे पारतंत्र्यात जगत होती. त्या भूमीत रयतेच स्वतंत्र सार्वभौम राज्य निर्माण करून जिजाऊंनी मराठ्यांची महाराष्ट्रभूमी स्वतंत्र केली आणि आपली स्वराज्याची मह्त्वाकांक्षा पूर्ण करूनच म्हणजे शिवरायांचा राज्याभिषेक करून त्यांना "श्री राजा शिवछत्रपती" हे बिरूद बहाल करूनच रायगडावर आपला प्राण त्याग केला. म्हणूनच एक गोष्ट प्रकर्षाने म्हणावी लागते, " शिवरायांची किर्ती सांगते आईचं माझी गुरु"
हेही वाचा :