[author title="डॉ. श्रीमंत कोकाटे" image="http://"][/author]
राजमाता जिजाऊ यांच्या जीवनात अनेक संकटे आली. निजामाच्या दरबारात वडील लखुजीराजे आणि बंधूंची हत्या झाली. खंडागळे यांचा हत्ती पिसाळला, त्याप्रसंगी आप्तस्वकीयांत जीवघेणा संघर्ष झाला. दीर शरीफजीराजे, ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे रणमैदानात धारातीर्थी पडले. पुत्र शिवाजीराजे यांना जीवे मारण्यासाठी अफजलखान आला, पन्हाळा वेढा, आग्रा कैद, पुरंदरचा तह, राज्याभिषेकाचे राजकारण, असे अनेक प्रसंग जिजाऊ यांनी अनुभवले; पण अशा कठीण प्रसंगी त्या डगमगल्या नाहीत. उलट संकटाला संधी समजून त्यावर त्यांनी यशस्वी मात केली.
राजमाता जिजाऊंना बालपणापासूनच युद्धकला आणि राजनीतीचे बाळकडू मिळाले. वडील लखुजीराजे जाधवराव मातब्बर सरदार होते. जिजाऊंचे आजोळ फलटणच्या निंबाळकर घराण्यातील. मातोश्री म्हाळसाबाई या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होत्या. आई-वडिलांनी जिजाऊंना मुलांप्रमाणेच तलवार चालविणे, दांडपट्टा फिरविणे, घोडेस्वारी करणे, पोहणे, गोळा फेकणे, लढाई करणे, राजनीती यांचे शिक्षण दिले होते. जिजाऊ बालपणापासूनच युद्धकलेत तरबेज होत्या.
लखुजीराजेंनी मातब्बर सरदार व जुन्या नात्यातील मालोजीराजे भोसले यांचे शूर, पराक्रमी, रणझुंजार, राजानीतिनिपुण सुपुत्र शहाजीराजे यांच्याशी जिजाऊंचा विवाह केला. जिजाऊ कणखर, निर्भीड, हिंमतवान होत्या. त्या जितक्या संवेदनशील मनाच्या होत्या, तितक्याच त्या स्वाभिमानी आणि लढवय्या होत्या. परकीयांची चाकरी करण्यापेक्षा भूमिपुत्रांच्या स्वराज्याची त्यांना ओढ होती. त्यांनी शहाजीराजे, शिवाजीराजे आणि संभाजीराजे या तीन पिढ्यांमध्ये स्वराज्याची ज्योत पेटवली. जिजाऊ या स्वराज्याचे प्रेरणापीठ, ज्ञानपीठ, विद्यापीठ आणि संस्कारपीठ आहेत. पतीच्या निधनानंतर सती न जाता जिजाऊ आपल्या पुत्राच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. स्वराज्यनिर्मितीसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले.
सती प्रथेसारख्या क्रूर, अमानुष प्रथेला लाथाडणार्या जिजाऊ क्रांतिकारक होत्या. त्या ग्रंथप्रामाण्यवादी नव्हत्या, म्हणूनच त्या अशी हिंमत करू शकल्या. आदिलशहाचा सरदार मुरार जगदेवाने पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवून भूमिपुत्रांत भय निर्माण केले होते, त्याच पुण्यात बाल शिवबाला हाताशी धरून जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवून भूमिपुत्रांत अभय निर्माण केले, यावरून स्पष्ट होते की जिजाऊ बुद्धिप्रामाण्यवादी अर्थात प्रयत्नवादी होत्या. यश मिळविण्यासाठी हातात तलवार घ्यावी लागेल, रणांगण गाजवावे लागेल, चातुर्य पणाला लावावे लागेल, हे त्यांनी ओळखले होते. जपमाळ ओढून आणि नामजप करून स्वराज्य स्थापन करता येणार नाही, हे वास्तव ओळखणार्या जिजाऊ प्रागतिक विचारांच्या होत्या.
जिजाऊंना अन्यायाची चीड आणि न्यायाची चाड होती. त्या गरिबांप्रती कारुण्यमूर्ती होत्या. त्यामुळे त्या निर्भीड आणि लढवय्या होत्या. बाल शिवबाला मांडीवर बसवून महिलांवर अत्याचार करणार्या रांजे गावच्या बाबाजी गुजरला त्यांनी कठोर शिक्षा ठोठावली. राज्यातील सर्व स्त्रिया आणि लहान मुलांचे रक्षण झालेच पाहिजे, हा नियम जिजाऊंनी घालून दिला.
राज्य नीतिमूल्यांची जोपासना करणारे असले पाहिजे, हा त्यांचा कटाक्ष होता. त्यांनी शिरवळ परगण्यातील मुजेवी येथील लखो विठ्ठल आणि पुणे परगण्यातील बहेरखेड येथील गणोजी गुरव यांना जमिनीच्या खटल्यात योग्य न्याय दिला. राज्यात कोणावरही अन्याय होणार नाही आणि अन्याय करणारा मोकळा सुटणार नाही, याची काळजी जिजाऊंनी घेतली. जिजाऊंचा गुप्तहेर खात्यावर अंकुश होता. त्यांची स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा होती. शिवाजीराजे कोकण मोहिमेवर असताना खवासखान येत असल्याची बातमी जिजाऊंनी शिवरायांना पोहोच केली. जिजाऊ घोडेस्वारीमध्ये तरबेज होत्या. त्यांच्या धैर्याचे, शौर्याचे, पराक्रमाचे आणि लढाऊ वृत्तीचे वर्णन त्यांना प्रत्यक्ष पाहणार्या समकालीन कवींद्र परमानंदाने 'शिवभारत' या ग्रंथात विस्ताराने केले आहे.
शिवाजीराजे प्रदीर्घकाळ पन्हाळाच्या वेढ्यात अडकले असताना जिजाऊ अस्वस्थ झाल्या होत्या. त्या स्वतः शिवबाची सुटका करण्यासाठी हातात तलवार घेऊन घोड्यावर बसून निघतात, त्याप्रसंगी जिजाऊ काय म्हणतात त्याचे वर्णन परमानंद पुढीलप्रमाणे करतो, 'माझ्या पुत्रास स्वतः सोडवण्याचा मी प्रयत्न करीन आणि जोहराचे मुंडके आज युद्धातून घेऊन येईन.' यावरून स्पष्ट होते की, कठीण काळी जिजाऊ स्वतः हातात तलवार घेऊन घोड्यावर बसून युद्धास सज्ज होत असत. केवळ शहाजीराजांच्या महाराणी, शिवबाच्या माता, शंभूराजेंची आजी एवढी मर्यादित त्यांची ओळख नाही, तर त्या स्वतः महान योद्धा, शूर, मुत्सद्दी, धैर्यशाली, राजनीतिज्ञ होत्या.
शिवाजीराजे आग्रा कैदेत असताना जिजाऊंनी स्वराज्याचे नेतृत्व केले. त्यांनी स्वराज्याची इंचभर भूमीही शत्रूला जिंकू दिली नाही. त्यांनी आपल्या राज्यात कधीही भेदभाव केला नाही. त्यामुळे शिवरायांना साथ देणारे सर्व जातिधर्मातील मावळे निःस्वार्थ आणि निर्भीडपणे पुढे आले. जिजाऊंनी मावळ्यावर उदात्त विचारांचे संस्कार केले. त्यांच्यात नीतिमूल्यांची जोपासना केली. त्यांच्यात ध्येयवाद आणि आत्मविश्वास निर्माण केला. जिजाऊ या पराक्रमी, धैर्यशाली होत्या. त्या गरिबांची सावली होत्या. त्या दूरद़ृष्टीच्या होत्या. जिजाऊ या हिंमतवान, कर्तृत्ववान आणि पराक्रमी होत्या. त्या शिवाजीराजांच्या मार्गदर्शक दीपस्तंभ होत्या, असे वस्तुनिष्ठ वर्णन इतिहासकार कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, वा. सी. बेंद्रे, डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले आहे.