

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र होईपर्यंत महाविकास आघाडी व घटक पक्ष सीमा बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असा निर्धार करून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यात आला. कर्नाटक सरकारविरोधात महाविकास आघाडीतर्फे शाहू समाधिस्थळी धरणे धरण्यात आले.
महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचाही निषेध करण्यात आला. कर्नाटक सरकारला सुबुद्धी मिळो, असे साकडे यावेळी घालण्यात आले. आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटासह विविध संस्था, संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमा प्रश्नावर भूमिका स्पष्ट जाहीर करावी व केंद्र सरकारने मराठी भाषिकांना न्याय द्यावा, अशी ठाम भूमिका घेण्याचे आवाहन करून मुश्रीफ यांनी मराठी भाषिकांवरील अन्यायाविरोधात पेटून उठले पाहिजे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आमच्या बाजूने निकाल लागणार, असे जाहीर वक्तव्य करीत आहेत. एवढेच नाही तर ते सांगली, सोलापूर जिल्ह्यातील गावांची मागणीही करीत आहेत. या माध्यमातून मराठी भाषिकांना डिवचायचे आणि कर्नाटकची सहानुभूती मिळविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत भाजप सरकार भुईसपाट होईल या भीतीमुळे बोम्मई सीमाप्रश्नाचा आधार घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सीमाप्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयात लढा सुररू आहे. तो अंतिम टप्प्यात असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून जत आणि सोलापूरचा विषय का काढला जातो ? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने ही पूर्वतयारी सुरू आहे, अशी शंका येते, असे सांगुन सतेज पाटील म्हणाले, कोल्हापुरात झालेल्या दोन राज्यपालांच्या बैठकीतील वृत्तांत अधिकृतपणे जाहीर केला पाहिजे. बोम्मई जसे ठासून सांगतात, त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठासून उत्तर दिले पाहिजे. तरच तुमची भुमिका मराठी भाषिकांच्या बाजूने व पारदर्शक आहे, असे म्हणता येईल. सामान्यांना फटका बसू नये म्हणून संयमाने आंदोलन करीत असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी 'मरेंगे तो महाराष्ट्र में नही तो जेल में', 'महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो' अशा घोषणा देऊन वातावरण दणाणून सोडले. 'बेळगाव – निपाणी – कारवार – बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' अशा मजकुराच्या टोप्या त्यांनी घातल्या होत्या.
शिवसेनेचे (ठाकरे) संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी कर्नाटकची निवडणूक जिंकण्यासाठी सीमा प्रश्न काढला जात असल्याचा आरोप केला.
हिम्मत असेल तर कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी कोगनोळी नाक्यावर यावे, असे थेट आव्हान देऊन जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, कणेरी मठावर कर्नाटक भवन बांधण्यासाठीचे पैसे परत पाठवा, असे अदृश्य काडसिद्धेश्वर यांना सांगण्याची वेळ आली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या महापुरुषांच्या अवमानकारक वक्तव्यप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सोमवारी (दि. 12) दु. 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे देवणे यांनी सांगितले.
सीमाभागातील माजी आमदार दिगंबर पाटील, वसंतराव मुळीक, कॉ. दिलीप पवार, चंद्रकांत यादव, प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांची भाषणे झाली. आंदोलनात आ. पी. एन. पाटील, आ. राजेश पाटील, आ. जयश्री जाधव, आ. राजू आवळे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, राष्ट्रवादीचे व्ही. बी. पाटील, तसेच जिल्हाप्रमुख संजय पवार, गुलाबराव घोरपडे, मुरलीधर जाधव, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजू लाटकर, शारंगधर देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिलीप सावंत यांनी पोवाडा सादर केला. माजी महापौर आर. के. पोवार यांनी आभार मानले.
अधिक वाचा :