कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
केशवराव भोसले नाट्यगृहाचे स्ट्रक्चरल ऑडिटचे काम नवी मुंबई येथील स्ट्रक्टवेल डिझायनर्स अँड कन्सल्टंट या कंपनीकडून सुरूच आहे. बुधवारी बूम उपलब्ध झाल्याने इमारतीवर चढून अनेक ठिकाणचे नमुने मशिनच्या साहाय्यने घेण्यात आले.
कंपनीच्या टेक्निकल डायरेक्टरनी इंडोस्कोपी इन्स्पेक्शनद्वारे जळालेल्या भागाची पाहणी केली. बुधवारी थर्मोग्राफी करण्यात आली. बांधकाम स्ट्रक्चरला किती तडे गेले आहेत? विविध भागांच्या घेतलेल्या नमुन्यांची लॅबमध्ये तपासणी करून चार दिवसांत प्राथमिक अहवाल दिला जाईल, असे कंपनीचे टेक्निकल डायरेक्टर जयंत कदम यांनी 'पुढारी'शी बोलताना सांगितले.
नवी मुंबई येथील स्ट्रक्टवेल डिझायनर्स अँड कन्सल्टंट कंपनीचे टेक्निकल डायरेक्टर जयंत कदम, राजेश घोरपडे, ऋषीकेश सोनावणे, सुनील पोवार हे सोमवारपासून काम पाहत आहेत. पहिल्या टप्प्यात पाहणी करून काही निरीक्षणे नोंदविली आहेत.
दोन दिवसांपासून बांधकामाचे नमुने घेण्यात येत आहेत. त्यासाठी बूमची व्यवस्था महापालिकेने केली होती. ऑडिटचे तांत्रिक काम पूर्ण होण्यासाठी आणखी चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर महापालिकेला स्ट्रक्चरल ऑडिटचा पहिल्या टप्प्यातील रिपोर्ट दिला जाणार आहे. 2 दिवस बाकी