82 वर्षांपूर्वीच्या इतिहासावर प्रकाशझोत

82 वर्षांपूर्वीच्या इतिहासावर प्रकाशझोत
PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी सद्या पोलंड दौर्‍यावर आहेत. त्यांच्या या भेटीमुळे भारत व पोलंडच्या 82 वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा मिळाला आहे. X
Published on
Updated on
सागर यादव

कोल्हापूर : हिटलरच्या नाझी साम—ाज्यवादातून 1939 साली दुसर्‍या महायुद्धाची ठिणगी पडली. याचा मोठा फटका पोलंडला बसला. या देशाची आर्त हाक ऐकली गुजरातमधील जामनगर आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर या संस्थानांनी. कोल्हापूरच्या छत्रपतींनी तब्बल 5 हजार पोलिश निर्वासितांना आश्रय दिला. यातून वळिवडे (ता. करवीर) येथे वळिवडे कॅम्प नावाचे लिटल पोलंड निर्माण झाले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सद्या पोलंड दौर्‍यावर आहेत. त्यांच्या या भेटीमुळे भारत व पोलंडच्या 82 वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा मिळाला आहे. पोलंडपासून शेकडो कि.मी. दूर असलेला कोल्हापुरातील वळिवडे या छोट्याशा गावाशी पोलिश नागरिकांचे भावनिक नाते निर्माण झाले होते. 1939 ला हिटलरने पोलंडवर हल्ला करून तो पुन्हा उद्ध्वस्त केला. हजारोजण निर्वासित झाले. या निर्वासितांची जगण्याची धडपड सुरू असताना त्यांना मदतीचा हात दिला भारतातील जामनगर आणि कोल्हापूर या दोन संस्थानांनी. जामनगरमध्ये 500, तर कोल्हापूरमध्ये तब्बल 5 हजार पोलिश निर्वासित आश्रयास आले.

मराठा-पोलिश नातेसंबंध

कोल्हापूरचे तत्कालीन छत्रपती शहाजी महाराज यांनी कोल्हापुरातील वळिवडे या गावात पोलिश नागरिकांची स्वतंत्र वसाहत स्थापन करून त्याला ‘वळिवडे कॅम्प’ असे नाव दिले. तेथे छत्रपतींनी नागरिकांना रस्ते, पाणी, शाळा, दवाखाने, सिनेमा हॉल, ग्रंथालय, दुकानांसारख्या विविध सोई-सुविधा निर्माण करून दिल्या. वळिवडेच्या वसाहतीत पोलिश व मराठा लोक एकत्र कुस्ती, हॉकी, फुटबॉलसारखे खेळ खेळू लागले. सण-उत्सव साजरे करू लागले. यातून नातेसंबंधही निर्माण झाले. वांदा नोवीच्का या पोलिश तरुणीने मराठी तरुणाशी लग्न केले. कोल्हापूरच्या सुनबाई बनलेल्या या युवतीने आपले नामकरण मालती काशीकर असे केले होते.

वळिवडेत स्मृती संग्रहालयाची घोषणा

कोल्हापूर-पोलंड संबंधाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तत्कालीन खासदार संभाजीराजे यांच्या पुढाकाराने पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री मर्सिन प्रिझिडॅक्झ, राजदूत अ‍ॅडम बुरॉकोस्की, एअरलाईनचे अध्यक्ष मिल्झाक्झार्स्की, कौन्सुलेट जनरल डॅमियन आयर्झीक यांच्यासह 30 जणांचे शिष्टमंडळ कोल्हापूर भेटीला आले होते. यावेळी 1942 ते 1948 या काळात वळिवडे येथे वास्तव्य केलेल्या 12 पोलिश नागरिकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. पोलिश नागरिकांना आश्रय दिल्याबद्दल पोलंड कायम कोल्हापूरच्या ऋणात राहील. मैत्रीच्या या भावनिक नात्याबरोबरच कोल्हापूरच्या परिसरात उद्योग, व्यवसाय, सांस्कृतिक, पर्यटन यामध्ये आदान-प्रदान केले जाईल, असे यावेळी या भारावलेल्या नागरिकांनी सांगितले होते. कोल्हापूर आणि पोलंडच्या मैत्रीचे प्रतीक म्हणून वळिवडेत स्मृती संग्रहालय (मेमोरियल म्युझिअम) साकारण्याची घोषणाही करण्यात आली होती.

PM Narendra Modi
Narendra Modi : पोलंडमध्ये कोल्हापूरच्या स्मारकासमोर मोदी नतमस्तक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news