

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यातच आता हिंदू धर्मातील सणांना प्रारंभ झाला आहे. परिणामी, सण-उत्सवाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुकांची धडपड सुरू आहे. गोपाळकाला उत्सव तर पर्वणी ठरला आहे. दहीहंडीला गोविंदा पथकांवर लाखो रुपयांच्या बक्षिसांची उधळण करत राजकीय दहीहंडीतून मतदारांना आकर्षित करण्याचे थर रचण्यात येत आहेत. विविध पक्षांकडून मतांवर डोळा ठेवून दहीहंडींचे आयोजन करण्यात येत आहे.
दरवर्षीच कोल्हापुरात मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी केली जाते. मात्र, यंदाच्या दहीहंडी उत्सवाला विधानसभा निवडणुकीची किनार लाभली आहे. नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यात सर्वच राजकीय पक्षांचा समावेश आहे. पूर्वी तरुण मंडळाच्या वतीने दहीहंडी साजरी केली जात होती. लक्ष्मीपुरीत धान्यव्यापारी मित्र मंडळाची कोल्हापुरात सर्वात उंच दहीहंडी होती. कालांतराने दहीहंडीला राजकीय पक्षांनी हायजॅक केले. अर्थात, त्यामुळे स्वरूप बदलून उत्सवाला ग्लॅमर प्राप्त झाले. प्रचंड मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा होऊ लागला. आकाश उजळवणार्या रंगीबेरंगी लाईटस्, वाद्यांचा दणदणाट अन् तरुणाईचा सळाळता उत्साह यामुळे अवघ्या कोल्हापूर शहरात उत्साहाचे वातावरण असते. दहीहंडी उत्सवाचे सर्वांनाच वेध लागले आहेत. कोल्हापुरातील अवघी तरुणाई दहीहंडी पाहण्यासाठी रस्त्यावर उतरलेली असते. तरुणाईला कॅच करण्यासाठी राजकीय पक्षांत रस्सीखेच सुरू असते. एकावर एक मानवी मनोरे रचून आकाशाला गवसणी घालणारी दहीहंडी फोडण्यासाठी आणि लाखो रुपये बक्षिसांची लयलूट करण्यासाठी सर्व गोविंदा सज्ज झाले आहेत.
कोल्हापुरात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होणार, हे स्पष्ट आहे. युती आणि आघाडी अनेक पक्षांची असल्याने प्रत्येक पक्ष आपल्यालाच जागा मिळावी, यासाठी आग्रही आहे. त्यामुळे महायुतींतर्गत आणि महाविकास आघाडीकडून कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीची जागा कुणाला मिळणार? हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकांनी लढण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यानुसार बांधणी केली असून, नियोजन होत आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि भाजप, तर महाआघाडीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने दावा सांगितला आहे.
कोल्हापुरातील बहुतांश मोठ्या दहीहंडी आता प्रत्येक राजकीय पक्षांशी संबंधित झाल्या आहेत. दहीहंडी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग बाहेर पडत असल्याने जास्तीत जास्त गर्दी खेचण्यासाठी तरुण मंडळे सिनेसृष्टीतील कलाकार, टीव्ही मालिकेतील कलाकार आदी सेलिब्रिटींना आणतात. त्याबरोबरच देशातील नामवंत डान्स ग्रुपही आणले जातात. ज्या ठिकाणी नामवंत सेलिब्रिटी आणि उत्कृष्ट डान्सग्रुप असतात, तेथे तरुणांच्या गर्दीचा उच्चांक होतो.
धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपच्या वतीने दसरा चौकात 3 लाख रुपये बक्षिसाची दहीहंडी होणार आहे. खासदार धनंजय महाडिक आयोजित करत असलेली ही दहीहंडी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी आहे. जिल्ह्यातून अनेक गोविंदा पथके ही दहीहंडी फोडण्यासाठी येत असतात. विशेष म्हणजे महायुतीसह सर्वच राजकीय पक्षांची येथे हजेरी असते.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात 1 लाख रुपये बक्षिसाची दहीहंडी आहे. क्षीरसागर यांनी चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मानवी मनोरा रचून दहीहंडी फोडतानाचे होर्डिंग लावले आहे. शहरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने दोन वर्षांपासून मिरजकर तिकटी येथे दहीहंडी साजरी केली जात आहे. 1 लाख 51 हजार रुपये बक्षिसाची ही दहीहंडी आहे. ‘निष्ठा दहीहंडी’ असे त्याला नाव देण्यात आले आहे. महाविकास आघाडीतील पक्ष या दहीहंडीत सहभागी होतात.
माजी नगरसेवक किरण नकाते यांची न्यू गुजरी मित्र मंडळाच्या वतीने एक लाखाची दहीहंडी आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे. तसेच मनसेच्या वतीने विजय करजगार यांची भाऊसिंगजी रोडवर 51 हजारांची दहीहंडी होणार आहे.