

धुळे : धुळे येथील जुनी महानगरपालिका समोर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांच्या नेतृत्वात युती सरकार विरोधात "महायुतीचे काळे कारनामे" अशी प्रतिकात्मक दहीहंडी साजरी करून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टी आणि युती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजप पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणातील व सामाजिक क्षेत्रातील संयमी मर्यादांना तिलांजली देऊन महायुतीचे घटनाबाह्य सरकार स्थापन केले. स्वार्थी आणि लाचार मानसिकतेतून महाराष्ट्राच्या जनतेवर लादलेले हे महायुतीचे सरकार आहे अशी टीका भोसले यांनी केली.
राज्यातील उद्योगधंदे गुजरातला नेले जात आहे. महिला व मुलींवर लैंगिक अत्याचार होत आहे. राज्यातील बेरोजगारी वाढत चालली आहे. राज्यभर गोळीबार, अत्याचार, असुरक्षतेचे वातावरण तयार झाले आहे. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून सरकार स्वतःचा उदो उदो करण्यात मग्न आहे. तरुणांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. आरक्षणाच्या नावाखाली समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम भाजप व युती सरकार करीत आहे. धर्माच्या नावाखाली विष पसरण्याचं काम युती सरकार करीत आहे. राज्याचे अनेक प्रलंबित प्रश्न असताना सुद्धा महायुतीचे खासदार, आमदार महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवण्यामध्ये मशगुल आहेत. दिल्लीच्या समोर महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवण्याचं काम हे युती सरकार करीत आहे असा आरोप देखील यावेळी करण्यात आला. राज्यातील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे कारनामे जनतेसमोर यावे म्हणून काळे फुगे लावून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष दहीहंडीचा कार्यक्रम घेत असल्याचे सांगण्यात आले.
काळे फुगे लावून सरकारविरुद्ध घोषणा देऊन काळे कारणामाची दहीहंडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज फोडली व सरकारचा निषेध व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले, जोसेफ मलबारी, शशी भदाने, नंदू यलमामे, राजू डोमाळे, यशवंत पाटील, राजेंद्र सोलंकी, किरण बागुल, डी. टी. पाटील, विश्वजीत देसले, राजू चौधरी, तरुणा पाटील, भिका नेरकर, निखिल मोमया, जयश्री घेटे, राजेंद्र चौधरी, मनोहर निकम, प्रशांत बोरसे, डॉमिनिक मलबारी, रामेश्वर साबळे, कुणाल वाघ, राजेंद्र सोनवणे, जीवन चव्हाण, युसुफ शेख, सलमान खान, आकाश बैसाणे, उजेर शेख, सोनू घारू, तसवर बेग असे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.