

पेठ वडगाव : येथील बळवंतराव यादव हायस्कुल मधील कलाशिक्षक व भादोले येथील रहिवासी संतोष कांबळे यांनी दसऱ्याला वाटल्या जाणाऱ्या आपट्याच्या पानावर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठतील देवतांची चित्रे साकारली आहेत.
कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका आणि वणी (नाशिक) येथील सप्तशृंगी माता. यातील वणी येथील सप्तशृंगी मंदिर हे अर्धे शक्तीपीठ मानले जाते, या सर्व देवतांच्या प्रतिमा आपट्याच्या पानावर रेखाटले आहेत सोबत दख्खनचा राजा श्री ज्योतिबा व श्री बालाजी यांच्या सुद्धा प्रतिमा रेखाटले आहेत. सर्वत्र दुर्गेची प्रतिष्ठापना केली जाते म्हणून दुर्गा माता सुद्धा या पानावरती सुंदर व सुबक पद्धतीने रेखाटन केले आहे. पोस्टर कलर च्या माध्यमातून हे चित्र रेखाटण्यास चार तास कालावधी लागला.
दसऱ्याला सर्वत्र "सोन घ्या,सोनं सारखं राहा " म्हणून जे पान वाटलं जातं याच पानाला या सुंदर कलाकृतींच्या मुळे या देवी देवतांच्या प्रतिमेच्यामुळे सोन्याची झळाळी प्राप्त झाली आहे. चार इंच पानाच्या पृष्ठभागावर रंगाच्या साह्याने कोणत्याही रेखाटन न करता हुबेहूब प्रतिमा रेखाटल्या आहेत. आजवर अनेक देवदेवतांच्या महापुरुषांच्या प्रतिमा याच आपट्याच्या पानावर त्यांनी यापूर्वी रेखाटल्या असून विविध माध्यमामध्ये अनेक कलाकृती त्यांनी रेखाटलेल्या आहेत फलक रेखाटणांमध्ये सुद्धा फक्त रंगीत खडूच्या सहाय्याने हुबेहूब प्रतिमा रेखाटण्यात त्यांचे कौशल्य आहे.