

कोल्हापूर : हलगीचा कडकडाट.. रणरागिणींच्या चपळ हालचालींनी तलवारबाजी... दांडपट्टा, लाठीकाठी यासह प्राचीन युद्धकलांचा थरार प्रेक्षकांनी अनुभवला. कोल्हापूरच्या ऐतिहासिक भवानी मंडपात शाही दसरा महोत्सव 2025 अंतर्गत आयोजित युद्धकला प्रात्यक्षिकांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
प्रात्यक्षिकांमध्ये तलवारबाजी, दांडपट्टा आणि लाठीकाठी यासह विविध युद्धकलांचे सादरीकरण करण्यात आले. प्रत्येक कलाकाराने कौशल्याने प्राचीन युद्धकलांचा वारसा आजही जीवंत असल्याचे दाखवून दिले. स्पर्धेत अनेक पुरस्कारप्राप्त कलाकार व चित्रपट, नाटकांमध्ये युद्धकला सादर करणार्या कलाकारांनी भाग घेतला. ज्यामुळे कार्यक्रमाला आणखी रंगत आली. हलगीच्या तालावर सादर झालेल्या प्रात्यक्षिकांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट, उत्साहपूर्ण प्रोत्साहनाने कलाकारांचा उत्साह वाढवला. युद्धकलांच्या सादरीकरणाने कोल्हापूरच्या सांस्कृतिक,ऐतिहासिक वारशाची झलक पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आणली.
युद्धकला स्पर्धेत शांतीदूत मर्दानी आखाडा, शिवशाही मर्दानी आखाडा, शिवगर्जना मर्दानी आखाडा, राजमुद्रा प्रतिष्ठान, श्रीमंतयोगी मर्दानी आखाडा, आनंदराव पोवार प्राचीन युद्धकला, शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंच, जयभवानी मर्दानी खेळ, शिवछत्रपती मर्दानी आखाडा व महाराणी ताराराणी मर्दानी आखाडा यांनी सहभाग घेतला. संघांमधील कलाकारांनी प्राचीन युद्धकलांचे कौशल्य व पराक्रम दाखवत उपस्थितांची मने जिंकली. सादरीकरणावेळी मान्यवरांच्या हस्ते सहभागींना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, नायब तहसीलदार नितीन धापसे, प्रमोद पाटील, उदय गायकवाड?उपस्थित होते.