

Suspicious Death
राशिवडे: पनोरी ता. राधानगरी येथील श्रीमंती हरी रेडेकर(वय७३) या वृध्देचा मृतदेह विजय शंकर बरगे यांच्या गोबरगॅस मध्ये संशयास्पदरित्या आढळुन आला होता. या वृध्देचा डोक्यात प्रहार करुन खुन करुन मृतदेहाची विल्हेवाट करण्यासाठी गोबरगॅस मध्ये टाकल्याची फिर्याद मुलगा अमित हरी रेवडेकर यांनी राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये दिली. त्यामुळे या गुन्हा गुंता वाढला असून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, श्रीमंती रेडेकर या गणेशोत्सवासाठी कोल्हापुरहून पनोरी गावी आल्या होत्या. यादरम्यान दि.२८ऑगस्टला मुलगा अमित पत्नीसह पनोरी येथे आले व गौरी आगमनानंतर दि.१ सप्टेंबरला कोल्हापूरला परत गेले. त्यानंतर श्रीमंती रेडेकर या घरी एकट्याच होत्या, त्यांनी दि. ६ सप्टेंबरला रात्री ८.१५ वा. सुनेसह मुलगा अमित यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन गावात मिरवणुक असल्याने गाण्याचा आवाज सहन होत नाही असे सांगून मागील खोलीत जाऊन बसते असे सांगितले.
त्यानंतर दि.६ ते ७ यादरम्यान दुध.४.३०च्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी डोक्यात कशाने तरी मारहाण करुन खुन करुन पुरावा नष्ट करण्यासाठी श्रीमंती रेडेकर यांचा मॄतदेह विजय शंकर बरगे यांच्या घराण्यातील गोबरगॅस मध्ये टाकुन विल्हेवाट लावण्याची फिर्याद अमित रेडेकर यांनी दिली. अधिक तपास पो.नि.संतोष गोरे, उपनिरीक्षक प्रणाली पवार करत आहेत. या खुनाच्या तपासासाठी श्वानपथक ही पाचारण करण्यात आले होते हे श्वान आसपास दोनशे मीटर पर्यंत घुटमळले, तर गावातील सी.सी.टी.व्ही.फुटेजही तपासण्यात आले.
श्रीमंती रेडेकर यांचा चोरीच्या उद्देशाने खुन केल्याचा अंदाज असुन श्वानही घटनेच्या आसपास दोनशे-तीनशे मीटर पर्यंतच घुटमळल्याने मारेकरी स्थानिक, माहीतगार असावा असा संशय आहे.