कोल्हापूर : ध्वनी मर्यादेच्या उल्लंघनासह मिरवणुकीत लेसर किरणांचा वापर करणार्या कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांविरुद्ध कठोर पावले उचलण्यात आली आहेत. पाचही जिल्ह्यांतील 800 गणेशोत्सव मंडळांविरुद्ध थेट न्यायालयात खटले दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे, असे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले. सराईत गुन्हेगारी टोळ्यांसह दारू, गुटखा व अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
यंदाचा गणेशोत्सव शांतता आणि उत्साहात साजरा करण्यासाठी पोलिस यंत्रणेमार्फत विशेष प्रयत्न करण्यात आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अस्थिरता निर्माण करणार्या समाजकंटकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दारू, गुटखा, अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कठोर पावले उचलण्यात आली. तस्कराकडून कोट्यवधीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर परिक्षेत्रात 27 हजार 763 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना झाली. अनंत चतुर्दशीला 14 हजार 261 मंडळांच्या विसर्जन मिरवणूक होत आहेत. मंडळाकडून ध्वनी मर्यादेचे उल्लंघन होऊ नये, लेसर किरणांचा वापर टाळावा, यासाठी पोलिस यंत्रणेमार्फत खबरदारी घेण्यात येत आहे. ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणार्या कोल्हापूर जिल्ह्यातील 251, सांगली- 202, सातारा- 14 आणि पुणे ग्रामीणमधील 178 मंडळांच्या पदाधिकार्यांविरुद्ध खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही ते म्हणाले.
कोल्हापूरसह पाचही जिल्ह्यांत विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात येत आहे. यामध्ये 5 पोलिस अधीक्षक, 7 अपर पोलिस अधीक्षक, 35 पोलिस उपअधीक्षक, 128 पोलिस निरीक्षक, 506 सहायक, उपनिरीक्षक, 8 हजार 804 पोलिस अंमलदार, 5 हजार 250 गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव दलाच्या 5 तुकड्यांचा समावेश आहे. याशिवाय अतिरिक्त मनुष्यबळ पाचारण करण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संघटित टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 40 जणांवर मोकाअंतर्गत कारवाई प्रस्तावित असल्याचेही महानिरीक्षक फुलारी यांनी सांगितले.