

कोल्हापूर : मृत्युनंतर देह संपतो परंतू अवयवदान केल्यास आपण आठ लोकांना नवीन जीवन देऊ शकतो. त्यामुळे ‘मरावे परी देह अन् अवयवरूपी उरण्याचा प्रयत्न करावा’, असे उद्गार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांनी काढले.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत अंगदान-जीवन संजीवनी अभियान अंतर्गत दि. 15 ऑगस्टपर्यंत अवयवदान जनजागृती पंधरवडा राबवण्यात येत आहे. या निमित्त सीपीआर हॉस्पिटल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. वाडीकर बोलत होते.
अवयवदानामध्ये मागणी व उपलब्धता यामध्ये प्रचंड तफावत असल्याने समाजात व्यापक जनजागृती होणे अत्यावश्यक आहे. यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात अवयवदान मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून क्यूआर कोडद्वारे नोंदणीची सोय करण्यात आली असून, जास्तीत जास्त नागरिकांनी नोंदणी करून या जीवनदायिनी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही डॉ. वाडीकर यांनी केले.
अवयवदानामध्ये कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर असून नेत्रदानामध्ये तिसर्या स्थानावर आहे तसेच प्रतिज्ञा फॉर्म भरण्यात राज्यात अव्वलस्थानी आहे. यावेळी योगेश अग्रवाल यांनी अवयवदान संबंधी सविस्तर माहिती दिली. सीपीआरचे जिल्हा सल्लागार डॉ. व्ही. ए. आरळेकर यांनी अवयवदानाची प्रतिज्ञा दिली. प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य एस. पी. घाटगे यांनी स्वागत केले. जॉन लोखंडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.