kolhapur News | दर्जेदार कामे नियोजित वेळेत करा
कोल्हापूर : दर्जेदार कामे नियोजित वेळेनुसार करा, अशी सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना सोमवारी दिल्या. सर्किट बेंचसाठी तयार करण्यात येत असलेल्या इमारतीच्या कामांची त्यांनी पाहणी केली. यानंतर अधिकार्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे कामकाज दि.18 ऑगस्टपासून सुरू होत आहे. सर्किट बेंचसाठी जिल्हा न्यायालयाच्या जुन्या इमारतीत युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. या कामांची येडगे यांनी पाहणी केली. इमारतीत सुरू असलेल्या सर्व कामांबाबत त्यांनी माहिती घेत सूचना केल्या.
मुख्य इमारतीत दोन कोर्ट रूमचे काम सुरू आहे. यासह जुन्या ऐतिहासिक इमारतीत एक कोर्ट रूम तयार केली जात आहे. राधाबाई इमारतीत रजिस्टार यांचे कार्यालयाचे काम सुरू आहे. यासह विद्युतीकरण, न्यायमूर्ती तसेच बेंचच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या वाहनांचे पार्कींग, कार्यालयीन कामकाजासाठीची व्यवस्था आदी विविध कामांची त्यांनी सखोल पाहणी केली.
पाहणीनंतर सायंकाळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकार्यांची बैठक घेतली. यावेळी सर्किट बेंचचे कामकाज दि.18 ऑगस्टपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी सर्व कामे पूर्ण करा. ही कामे करताना गती वाढवा मात्र, कामांचा दर्जा कायम राहील, याचीही दक्षता घ्या. सर्किट बेंचला साजेशी सर्व कामे होतील, याकडे अधिक लक्ष द्या, अशा सूचनाही येडगे यांनी दिल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता एस.डी.कट्टी, उपअभियंता महेश कांजर आदींसह संबधित अधिकारी उपस्थित होते.
शेंडा पार्कातील खंडपीठ इमारतीसाठी लवकरच प्रक्रिया
दरम्यान, खंडपीठासाठी शेंडा पार्क येथील रि.स.न. 604 मधील 6 हेक्टर 20 आर. आणि रि.स.न. 589 मधील 2 हे.98.40 आर. अशी एकूण हे. 9.18.40 आर. (सुमारे 24 एकर) जमीन राखीव ठेवली आहे. सर्किट बेंचचे प्रत्यक्ष कामकाज सुरू झाल्यानंतर शेंडा पार्कातील या जमिनीवर खंडपीठ इमारत उभारणीसाठीचीही प्रक्रिया सुरू केली जाईल, असे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले. इमारत आणि त्यातील सुविधांबाबत उच्च न्यायालयाकडून सूचना येईल, त्यानुसार त्याचा आराखडा तयार केला जाईल, तो प्रशासकीय मंजुरीसाठी राज्य शासनाला पाठवला जाईल. सर्व सोईनियुक्त अशी कोल्हापूर खंडपीठाची आकर्षक इमारत उभी राहील, यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न असतील, असेही त्यांनी सांगितले.

