कोल्हापूर : ‘बाजीप्रभूं’ना पावनखिंडीत वाहिली शासकीय आदरांजली, शिवभक्तांची मांदियाळी

कोल्हापूर, बाजीप्रभू
कोल्हापूर, बाजीप्रभू
Published on
Updated on

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा :

'इथेच पडला बांध खिंडीला बाजीप्रभूच्या छातीचा,
 येथेच फुटली छातीपरी दिमाख न हटला जातीचा,
आठवण येता अजून येतो दाटून खिंडीचा गळा, 
 विशाळगडच्या विशाल भाली रक्तचंदनी खुले टिळा!!'

या ऐतिहासिक पावनखिंड शौर्यगाथेला १३ जुलैला ३६३ वर्षे पूर्ण झाली आहेत. येथे आज प्रांताधिकारी समीर शिंगटे व तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या हस्ते बाजीप्रभूच्या स्मृतिस्थळास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. दाट धुके, कोसळणाऱ्या जलधारा, अंगाला झोंबणारा खट्याळ वारा आणि निसरड्या वाटा, चिखल असा खडतर प्रवास करत 'जय भवानी, जय शिवाजी…, नरवीर बाजीप्रभू देशपांडे की जय' च्या अखंड जयघोषात येथील सह्याद्रीच्या डोंगररांगा शिवप्रेमीच्या निनादाने दुमदुमल्या. निमित्त होतं बाजीप्रभू व फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथीच.

शिवकाळात १२ व १३ जुलै १६६० या दिवशी पन्हाळगड ते विशाळगड मार्गावर प्रचंड रणकंदन घडले. रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण करणार्‍या शिवछत्रपतींच्या रक्षणार्थ नरवीर शिवा काशीद, वीर बाजीप्रभू-फुलाजीप्रभू देशपांडे, रायाजी नाईक-बांदल, विठोजी काटे, संभाजी जाधव यांसह ज्ञात-अज्ञात पराक्रमी मावळ्यांनी पन्हाळगड ते विशाळगड मार्गावर आपल्या प्राणाचे बलिदान दिले. या घटनेला ३६३ वर्षे पूर्ण झालीत. त्यांच्या हौतात्म्यास अभिवादन करणेसाठी तसेच त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी १३ जुलै रोजी शासकीय पूजन व मानवंदना देऊन स्मृतिस्थळास पुष्पचक्र वाहण्यात येते. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास शाहूवाडी तालुका प्रशासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.

पावनखिंड रणसंग्रामात बाजीप्रभू देशपांडे यांचा सिंहाचा वाटा होता. या रणसंग्रामात ते धारातीर्थ पडले. त्यांना व स्वामीनिष्ठ मावळ्यांना आदरांजली वाहण्यासाठी प्रत्येक वर्षी पावनखिंड येथे पुण्यतिथी साजरी केली जाते. नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड येथे केलेला पराक्रम आणि दिलेली प्राणाची आहुती आजही साऱ्याना प्रेरणा देणारी असल्याचे प्रतिपादन यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी केले.

दरम्यान येथील बाजीप्रभू व फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या स्मृतिस्थळास प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार रामलिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, निखिल खेमणार यांच्या हस्ते स्मृतिस्थळाचे पूजन करून पुष्पचक्र अपर्ण करून आदरांजली वाहण्यात आली. सह्याद्री प्रतिष्ठानच्या 'पन्हाळा ते पावनखिंड'पदभ्रमंती मोहिमेत सहभागी झालेल्या मावळ्यांच्या 'जय शिवाजी जय भवानी' च्या घोषणांनी पावनखिंड परिसर दणाणून गेला होता. दिवसभर अनेक संघटनांनी पावनखिंड येथे भेट देऊन स्मृतिस्थळास अभिवादन केले. शिवभक्तांची पावनखिंडीत मांदियाळी होती.

यावेळी मंडल अधिकारी संभाजीं शिंदे, तलाठी घनशाम स्वामी, अभिजित मुळीक, सरपंच चंद्रकांत पाटील, ग्रामसेवक प्रमोद गायकवाड, पोलीस पाटील विठ्ठल वेल्हाळ, पतंजली योग समिती कोल्हापूर जिल्हा प्रभारी शांताराम पाटील, शहर प्रभारी विलास निकम, तालुका प्रभारी संभाजी लोहार, कोतवाल प्रणित कदम, एस टी पाटील, के ए पाटील, टी टी सुतार, सचिन चव्हाण, संतोष वेल्हाळ आदींसह हजारो शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news