

निपाणी : शहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध भागांत मोकाट जनावरांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारपेठेतील रस्त्यांवर डझनभर जनावरे ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यातच मोकाट जनावरांच्या अचानक होणाऱ्या झुंजींमुळे नागरिक व वाहनधारकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
शहरातील प्रमुख बाजारपेठ, चौक, बसस्थानक परिसर तसेच रहदारीच्या रस्त्यांवर मोकाट जनावरे मोठ्या संख्येने फिरताना दिसत आहेत. खाद्यपदार्थांच्या शोधात ही जनावरे दुकानांसमोर तसेच रस्त्याच्या मध्यभागी येत असल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत जनावरांच्या झुंजी झाल्यास नागरिक व दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण होतो.काही वेळा मोकाट जनावरे अचानक रस्त्यावर धावत येत असल्याने वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावा लागतो. त्यामुळे किरकोळ अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना या जनावरांपासून विशेष धोका असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मोकाट जनावरांमुळे शहराच्या स्वच्छतेवरही परिणाम होत असून, रस्त्यावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची जनावरे नासधूस करतात. त्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होते. नगरपालिकेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने मोहीम राबवून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.शहरातील वाढती वाहतूक आणि नागरिकांची गर्दी लक्षात घेता नगरपालिकेने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
“शहरातील मुख्य बाजारपेठेत मोकाट जनावरांची संख्या वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांच्या झुंजीमुळे कधीही मोठा अपघात होऊ शकतो. या झुंजीमुळे दुकानदार (व्यापाऱ्यांकडून) मागविण्यात आलेल्या मालाची नासधूस होत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा वागत आहे. नगरपालिकेने याकडे तातडीने लक्ष देऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा.”
-अमर उपाध्ये, किराणा व्यापारी, निपाणी.