

आष्टी : आष्टी शहरालगतच्या प्रभाग क्रमांक १५ व १६ परिसरातील शेतशिवारात मोकाट जनावरे आणि वराहांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. नुकत्याच झालेल्या पावसानंतर मोठ्या आशेने पेरणी केलेली पिके मोकाट जनावरे चरत असून, वराहांकडूनही पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली जात आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून नगरपंचायतीने तातडीने उपाययोजना न केल्यास धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी सांगितले की, पावसाच्या अनिश्चिततेमुळे यंदाचा हंगाम आधीच संकटात सापडला आहे. त्यात मोकाट जनावरे दिवस-रात्र शेतात घुसून कोवळ्या पिकांवर ताव मारत आहेत. वराहांकडून पिकांचे नुकसान होण्याबरोबरच शेतात मोठ्या प्रमाणात घाण केली जात असल्याने शेतीची अवस्था अधिकच बिकट होत आहे. त्यामुळे पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर शेतात पहारा द्यावा लागत आहे.
या गंभीर समस्येबाबत नगरपंचायतीकडे अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतीचा वाढता खर्च, अनिश्चित पाऊस आणि मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव यामुळे शेती करणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
नगरपंचायत प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे. पिकांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.
नगरपंचायतसमोर धरणे आंदोलन करणार
नगरपंचायतीने तातडीने मोकाट जनावरे व वराहांचा बंदोबस्त करावा. अन्यथा प्रभाग क्रमांक १५ व १६ मधील सर्व शेतकरी नगरपंचायतीसमोर धरणे आंदोलन करतील," असा इशारा शेतकरी किशोर धोंडे, लक्ष्मण रेडेकर, भाऊ माने, छोटू वाल्हेकर यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.