

Nipani Murgud Road Accident
निपाणी: निपाणी-मुरगूड मार्गावर बसवान नगर हद्दीत सावंतवाडी येथून मुंबईला जाताना निपाणीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला ओव्हरटेकच्या प्रयत्नात चिरडले. यावेळी झालेल्या भीषण अपघातात मित्राच्या घरी जेवण करून आपल्या कुटुंबीयांसह मूळगावी कोडणीकडे परतणाऱ्या लॉन्ड्री व्यावसायिक दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला. तर यात मृताची पत्नी व मुलगा असे दोघे गंभीर जखमी झाले आहे.
शिवाजी प्रभाकर शिंदे (वय ३३) असे मृताचे नाव आहे. तर पत्नी निता शिवाजी शिंदे (वय-३०), मुलगा श्रवण शिवाजी शिंदे, (वय-९) अशी दोघा गंभीर जखमीची नावे आहेत. यामध्ये मुलगी राधिका शिवाजी शिंदे (वय १२) हिला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार आहेत. हा अपघात रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास झाला. घटनेची नोंद शहर पोलिसात झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मुबंई येथील ४ युवक पर्यटनासाठी सावंतवाडीला गेले होते.तर शिवाजी शिंदे यांचे स्वतःचे निपाणीतील बेळगाव नाका परिसरात लॉन्ड्रीचे दुकान असून पत्नी दुसऱ्या लॉन्ड्रीत कामास आहे. काम संपल्यानंतर रविवारी मुलांना सुट्टी असल्यामुळे शिवाजी हे पत्नी व दोन मुलांसह निपाणी येथे नातेवाईंकाकडे जेवण करण्यासाठी गेले होते.जेवण करून घरी परतत असताना पर्यटन ओटोपल्यानंतर सावंतवाडीहून निपाणीमार्गे मुबंईला जाणाऱ्या भरधाव कारने निपाणी मुरगुड रोडवरील बसवानगर हद्दीत मुरगुडहून निपाणीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने कोडणीकडे जाणाऱ्या शिवाजी यांच्या दुचाकीला कारने जोराची धडक देत चिरडले.
यामध्ये दुचाकीचा चक्काचूर होऊन शिवाजी याचा उजवा पाय मांडीपासून निकामी झाला. यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. तसेच शिवाजीचा मुलगा श्रवण याच्या उजव्या मांडीचा चेंदामेंदा झाला. तर पत्नीच्या उजव्या पायाला दोन ठिकाणी फॅक्चर झाले. अपघातानंतर कार चालक व अन्य दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. तर एकाला नागरिकांनी पकडून बदडले.
दरम्यान घटनेची माहीती मिळताच कोडणीतील युवकांनी पोलिसांना पाचारण करीत घटनास्थळी तात्काळ धाव घेत बचावकार्य सुरू करीत जखमींना उपचारासाठी निपाणीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे जखमींना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलविले. दरम्यान मध्यरात्री उपचार सुरू असतानाच शिवाजी यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयातील प्राथमिक उपचारानंतर सध्या सीपीआरमध्ये शिवाजी याची पत्नी व मुलगा श्रवण यांच्यावर उपचार सुरू असून मुलगी राधिका हिला डिस्चार्ज मिळाला आहे. दरम्यान सोमवारी दुपारी १२ वा. शिवाजी याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
घटनास्थळी सीपीआय बी.एस.तळवार, उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ, हवालदार प्रभू सिद्धीठगीमठ यांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत मृत शिवाजी याची बहिण सुजाता राजेंद्र परीट (रा.अंमलझरी) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी कार मालक हरीश केवत (रा.वसई, मुंबई) याला वाहनासह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. मृत शिवाजी याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी,दोन बहिणी असा परिवार आहे. अत्यंत मनमिळाऊ असलेल्या शिवाजी शिंदे याचा या अपघातात अकाली मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत शिवाजी शिंदे यांच्या दोन बहिणी विवाहित आहेत.त्यामुळे शिवाजी याच्यावरच कुटुंबाची संपुर्ण जबाबदारी होती.त्यांच्या वडिलांचाही काही दिवसापूर्वी अपघात झाल्याने व आईवरही मोठी शस्त्रक्रिया झाल्याने दोघेही औषधोपचारात सध्या अंथरुणाशी खिळून आहेत.अशा परिस्थितीत मुलगा शिवाजी याचा अकाली मृत्यू झाल्याने या कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अपघात स्थळापासून पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्ग हे अंतर अवघ्या ३०० मीटरवर आहे.जर का अपघातग्रस्त कार आणखीन दोन मिनिटे पुढे येऊन कोल्हापूरच्या दिशेने महामार्गावरून मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाली असती तर हा अपघात टळला असता.मात्र केवळ दोन मिनिटाच्या फरकाने हा अपघात घडून दुर्दैवी शिवाजी शिंदे यांचा कारने बळी घेत कुटुंबाला पोरके केले.दरम्यान अपघातग्रस्त कारने दुचाकीला चिरडल्यानंतर रस्त्यावर आदळल्याने कारचा टायरही फुटल्याचेही यावेळी दिसून आले.