

निपाणी : पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरण प्रकल्पांतर्गत निपाणी येथील राधानगरी–मुरगुड मार्गावरील उड्डाणपुलाखालचा भुयारी मार्ग बुधवार सायंकाळपासून तात्पुरत्या स्वरूपात दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या एकेरी वाहतुकीमुळे वाहनधारकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. दुतर्फा वाहतूक सुरू झाल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उत्तरेकडील भुयारी मार्गावरील स्लॅब रुंदीकरणाचे काम अद्याप सुरू असल्यामुळे ही व्यवस्था तात्पुरती करण्यात आली आहे. संबंधित काम पूर्ण झाल्यानंतर पुढील काही दिवस दक्षिणेकडील भुयारी मार्गातूनही दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती रस्ते बांधकाम कंपनीने दिली.
हा भुयारी मार्ग महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. बेळगाव, मुरगूड, राधानगरी, कोल्हापूर आदी भागांतील जड-अवजड वाहनांसह देवचंद महाविद्यालय व परिसरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची या मार्गावर मोठी वर्दळ असते. त्यामुळे एकेरी वाहतुकीच्या काळात रोज रहदारी कोंडी होत होती. महामार्गालगत रुंदीकरण व इतर कामे अद्याप सुरू असल्याने वाहनधारकांनी भुयारी मार्गातून जाताना वेगावर नियंत्रण ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन रस्ते देखभाल कंपनीने केले आहे.