

Uday Samant on Vivekanand Patil Viral Video
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनात कोल्हापूरच्या विवेकानंद पाटीलने केलेली ठसकेबाज भाषणे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहेत. त्याच्या भाषणांचे व्हिडिओ व्हायरल होत असतानाच, राधानगरी तालुक्यातील माजगाव येथील त्याच्या साध्या घराचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. घरातील विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या ट्रॉफी पाहून अनेक तरुणांकडून विवेकानंदचे कौतुक केले जात आहे. आता मंत्री उदय सामंत यांनीही त्याचा व्हिडिओ आपल्या फेसबूकवर शेअर केला आहे.
उदय सामंत यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, “आज सोशल मीडियावर एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विवेकानंद पाटील याच्या घराचा व्हिडिओ पाहिला. त्याच्या घरात स्वामी विवेकानंद यांचा फोटो पाहून आनंद झाला.”
स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा दाखला देत सामंत यांनी पुढे म्हटले, “ज्ञान मिळवण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे ध्यान आणि एकाग्रता. एकाग्रतेच्या साहाय्यानेच विषयाच्या मूळ गाभ्यापर्यंत पोहोचता येते.”
विवेकानंद पाटील याचे घर पाहिल्यानंतर त्याच्या संघर्षाची कल्पना येते. मात्र, त्यापेक्षाही घरातील विविध पारितोषिके पाहून अधिक समाधान मिळाले, असे सामंत यांनी नमूद केले. “एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या पाठिशी महाराष्ट्र शासन सदैव उभे आहे,” अशी ग्वाहीही त्यांनी यानिमित्ताने दिली.
काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी अलीकडेच पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली होती. त्यावेळी कदम यांनी विवेकानंद पाटील याच्या घराचा उल्लेख केला. विवेकानंदची परवानगी असेल तर येत्या काही दिवसांत विवेकानंदच्या आई-वडिलांसाठी एक चांगले घर बांधण्याची जबाबदारी माझी, असे त्यांनी म्हटले. मात्र, बाणेदार स्वभावाच्या विवेकानंद पाटील याने विश्वजित कदम यांच्या या ऑफरला नम्रपणे नकार दिला.
तो म्हणाला, मला माझ्या परिस्थितीचे भांडवल करायचे नाही. मी कदम यांनी दिलेल्या प्रस्तावाबद्दल आभारी आहे. विवेकानंद पाटीलने सांगितले की, माझ्याकडे काही पैसे नाहीत, अशातला भाग नाही. माझ्या मैत्रिणीने मला सहा हजारांचे टायटनचे घड्याळ दिले आहे. घर काय आज ना उद्या बांधता येईल. मी आज माझे करिअर दावणीला लावून इथे उभा आहे. माझ्यापेक्षाही खूप वाईट परिस्थिती तुकाराम मुंढे यांची होती. ते रोज उधारीवर ऑम्लेट पावच्या गाडीवर जेवत होते. एक दिवशी त्यांच्यासाठी पैसे नव्हते, तर ते उपाशी झोपले. तुकाराम मुंढे यांनी कुठेही परिस्थितीचे भांडवल केले नाही.
विश्वजित कदमसाहेब, मला मोठ्या मनाने माफ करा. घर मी आज ना उद्या बांधेन. तुम्ही बोललात त्याने मला दहा हत्तींचे बळ मिळाले. माझ्यासारख्या अनेकांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. लांबचे कशाला दिवंगत पतंगराव कदमसाहेबांचे उदाहरण घ्या. त्यांनीही शून्यातून विश्व घडवले. त्यांनाही कोणीतरी मदत केली असती, पण त्यांनी ती घेतली नाही. मलाही तशीच कोणाची मदत घ्यायची नाही, असे विवेकानंद पाटील याने स्पष्टपणे सांगितले.