कोल्हापूर : एजीवडे ते दाजीपूर रस्त्यावर जैव वैद्यकीय कचरा; ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया

कोल्हापूर : एजीवडे ते दाजीपूर रस्त्यावर जैव वैद्यकीय कचरा; ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया

गुडाळ, पुढारी वृत्तसेवा : राधानगरी तालुक्यातील एजीवडे ते दाजीपूर या जैवविविधतेने संपन्न असलेल्या राज्य मार्गावर अज्ञाताने शनिवारी रात्री जैव वैद्यकीय कचऱ्याचे ढीग अनेक ठिकाणी रस्त्याकडेलाच टाकल्याचा संतापजनक प्रकार घटला. हा प्रकार आज (रविवार) स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर दाजीपूर परिसरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

दरम्यान, जागतिक वारसा स्थळ असलेल्या दाजीपूर अभयारण्य परिसरात रस्त्यावर वैद्यकीय कचरा टाकून वन्यप्राणी आणि परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अपप्रवृत्तीविरुद्ध तातडीने कडक कारवाई व्हावी अशी मागणी दाजीपूरचे सुपुत्र उद्योजक शाम कोरगावकर यांनी केली आहे. या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार असल्याचेही कोरगांवकर यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुक्यातील जैव वैद्यकीय कचरा संकलित करण्याचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका एजन्सीकडे आहे. या कंपनीकडे कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वाहनचालकाने हे कृत्य केले असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

याशिवाय राधानगरी तालुक्यातील वैद्यकीय व्यावसायिकाकडील जैव वैद्यकीय कचरा कोणत्या एजन्सीने उचलावयाचा? या वादात जवळपास गेले दोन महिने तालुक्यातील वैद्यकीय कचऱ्याचा उठाव झालेला नाही असे सांगण्यात येते. त्यामुळे घाट रस्त्यावर टाकण्यात आलेल्या या कचऱ्याचा तालुक्यात साठलेल्या कचऱ्याचीशी काही संबंध आहे का? याचीही शहानिशा होण्याची गरज असल्याचे नागरिकांनी म्हटलं आहे.

जंगल हद्दीतून गेलेल्या या मार्गावर टाकण्यात आलेल्या जैव वैद्यकीय कचऱ्यात सुया, ब्लेड्स, काचेच्या बॉटल्स यांचाही समावेश असल्याने जंगलातून ये -जा करताना रस्ता ओलांडणाऱ्या वन्यजीवांसाठी हा कचरा धोकादायक ठरणार आहे. त्यामुळे प्रशासनाने या घटनेचा पंचनामा करून या वैद्यकीय कचऱ्याची त्वरित विल्हेवाट लावावी अशी आग्रही मागणी शाम कोरगावकर यांनी केले आहे.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news