

यड्राव : शहापूर पोलिसांनी ‘मिशन झीरो ड्रग्ज’ मोहिमेंतर्गत मोठी कारवाई करत हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे तब्बल 6 लाख 73 हजार रुपये किमतीचे 134 ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी ड्रग्ज) जप्त केले. शुक्रवारी मध्यरात्री सापळा रचून केलेल्या या कारवाईत रेकॉर्डवरील संशयित वृषभ राजू खरात (वय 30, रा. लोकमान्यनगर, कोरोची) याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे इचलकरंजी आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी विशेष मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेंतर्गत पोलिस कॉन्स्टेबल सतीश कुंभार यांना गुप्त बातमीदारामार्फत वृषभ खरात हा एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. सुरुवातीला पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवला; मात्र वृषभला संशय आल्याने त्याने व्यवहार टाळला. तेव्हापासून पोलिस त्याच्या मागावर होते.
शुक्रवारी रात्री वृषभ इचलकरंजी-कोरोची मार्गावरील साईनाथ वजनकाट्याजवळ येणार असल्याची पक्की माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. वृषभ येताच पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडील सॅकमध्ये 47 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि अडीच हजार रुपयांची रोकड सापडली. अधिक चौकशी केली असता, त्याने घरात लपवलेले आणखी 87 ग्रॅम एमडी ड्रग्ज पोलिसांच्या स्वाधीन केले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय अधिकारी समरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, उपनिरीक्षक महावीर कुटे, श्रीकृष्ण दरेकर यांच्या पथकाने केली.
आठ दिवसांपूर्वीच इचलकरंजीतील गावभाग पोलिसांनी नशेसाठी वापरल्या जाणार्या मेफेंटरमाईन सल्फेटचा मोठा साठा जप्त केला होता. त्यानंतर आता शहापूर पोलिसांनी केलेली ही जिल्ह्यातील मोठी कारवाई आहे. मावा, गुटखा, गांजा आणि नशेच्या इंजेक्शननंतर आता थेट एमडी ड्रग्जसारखे घातक अमली पदार्थ शहरात सापडल्याने नशेचा विळखा किती घट्ट होत चालला आहे, हे स्पष्ट झाले आहे. या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले आहे.
‘मिशन झीरो ड्रग्ज’ मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे. शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांची विक्री किंवा सेवन करणार्यांविषयी गोपनीय माहिती असल्यास पोलिसांना कळवावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी केले आहे. माहिती देणार्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.