

कोल्हापूर : कोल्हापूरच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण परंपरांपैकी एक म्हणजे आषाढ महिन्यातील त्र्यंबोलीदेवीला नवे पाणी वाहून साजरी होणारी गल्ली जत्रा. आषाढातील शेवटच्या शुक्रवारी दि. 18 रोजी शहरात त्र्यंबोलीच्या आषाढी यात्रेला उधाण आले. तालीम मंडळे, गल्ल्या, पेठा येथील नागरिकांनी एकत्र येत साजर्या केलेल्या आषाढी यात्रेत यंदा डॉल्बीच्या दणदणाटात पारंपरिक पी ढबाक या वाद्याचा आवाज मंदावल्याचे चित्र दिसले.
श्रावण सुरू होण्यापूर्वी आषाढातील मंगळवार आणि शुक्रवारी पंचगंगेतील नव्या पाण्याने भरलेल्या कलशासोबत पी ढबाक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढायची आणि रात्री मटणाचे वाटे करून गल्लोगल्ली भोजनाचा आस्वाद घ्यायचा अशी या त्र्यंबोलीदेवीच्या आषाढी यात्रेची परंपरा आहे. शुक्रवारी सकाळपासूनच फुलांनी सजवलेले कलश घेऊन पेठा, गल्लीतून महिला पंचगंगा नदी घाटावर येऊ लागल्या. नदीला आलेल्या नव्या पाण्याचे विधिवत पूजा करण्यात आली. पावसाने विश्रांती दिल्याने कोल्हापूरकरांच्या उत्साहाला भरती आल्याचे दिसून आले. त्यानंतर काही मंडळे व तालमींच्या वतीने पी ढबाकच्या गजरात वाजतगाजत कलशांची मिरवणूक टेंबलाईवाडी येथील त्र्यंबोली मंदिरात आली. सकाळी त्र्यंबोली आणि मरगाईदेवीस श्रीसुक्ताने महाअभिषेक करण्यात आला. यानंतर श्रीपूजक शिवप्रसाद गुरव आणि संतोष गुरव यांनी देवीची अलंकार पूजा बांधली. शुक्रवारी दिवसभरात 109 इन्फंट्री बटालियन, नाथा गोळे तालीम, फिरंगाई तालीम, बजापराव माने तालीम, गंगावेस तालीम, राजारामपुरी पोलीस ठाणे, उत्तरेश्वर पेठ, बागल चौक, खंडोबा तालीम, पाटाकडील तालीम, शिव तरुण मंडळ, बापट कॅम्प, शनिवार पेठ, रविवार पेठ, मेढे तालीम लुगडी ओळ, फुलेवाडी यांच्या आषाढी यात्रा झाल्या. टेंबलाईदेवी रक्षक देवता असल्यामुळे तिच्या प्रसादाचे राखणीचे श्रीफळ भाविकांनी घेतले.
आषाढी यात्रेत पी ढबाक या पारंपरिक वाद्याचे महत्त्व वर्षानुवर्षे आहे; मात्र यंदा यात्रेतील कलश मिरवणुकीत कानठळ्या बसवणार्या डॉल्बीच्या ठेक्यावर नाचणारी तरुणाई, गुलालाची उधळण असा पारंपरिक बाज हरवलेला माहोल दिसला. याबाबत जुन्याजाणत्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. काही तालीम मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्रीपासूनच डॉल्बीचा सेटअप लावून ठेवला होता. शुक्रवारी गल्ली, पेठांमध्ये मांसाहारी जेवणाच्या पंगती उठेपर्यंत डॉल्बीचा ठेका सुरूच होता.
श्रावण महिन्याला 25 जुलैपासून प्रारंभ होणार आहे. मंगळवार, दि. 22 रोजी आषाढातील यात्रेचा शेवटचा दिवस मिळतो; मात्र दि. 23 रोजी अमावस्या आहे. त्यामुळे आषाढातील मंगळवार हा यात्रेसाठी शेवटचा दिवस असला, तरी शुक्रवारीच मोठ्या संख्येने यात्रा साजरी करण्यात आली.