कवठेगुलंद (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) : बुबनाळ (ता. शिरोळ) येथे गेली आठ दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे मातीच्या घराच्या भिंतीत पाणी मुरल्याने कच्ची घरे ढासळायला लागली आहेत. शुक्रवारी बुबनाळ येथील शेखर सदाशिव जाधव यांच्या राहत्या घराच्या भिंती ढासळून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. अजूनही कोसळणाऱ्या पावसामुळे जुन्या जीर्ण घरातील कुटुंबांची धाकधूक मात्र वाढली आहे.
आठ दिवसापासून संततधार पाऊस कोसळत असून एक-दोन दिवसांचा अपवाद वगळता संततधार पाऊस कोसळत आहे. सतत पडणाऱ्या पावसाचे पाणी भिंतीमध्ये मुरून घरांच्या भिंतीची पडझड सुरू झालेली आहे. बुबनाळ येथील शेखर सदाशिव जाधव यांच्या घराची भिंत आतील बाजूस पडली. सुदैवाने त्या खोलीत कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. तलाठी शिवप्रसाद चौगुले, महसूल कर्मचारी महेश शेडबाळे यांनी पडझडीचा पंचनामा केला आहे.
राहत्या घराची भिंती कोसळल्या असल्या तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून, संबंधितांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.