

Leopard Enters House Shahuwadi Nile
विशाळगड : शाहुवाडी तालुक्यातील निळे पुनर्वसन वसाहत येथे बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पहाटेच्या सुमारास एका बिबट्याने थेट घरात घुसून एका कुत्र्यावर हल्ला करत त्याला जखमी केले. ही घटना राजाराम कुंभार यांच्या घरात घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
निळे येथील पुनर्वसन वसाहत परिसरात पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. राजाराम कुंभार यांच्या घराच्या टेरेसवर झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. कुत्र्याच्या आवाजाने घरातील लोक जागे झाले. त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्या घाबरून पळून गेला, पण यात कुत्रा गंभीर जखमी झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे. बिबट्या आता मानवी वस्तीमध्ये शिरू लागल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वनविभागाने या घटनेची गंभीर दखल घेऊन परिसरात गस्त वाढवावी आणि बिबट्याला पकडण्यासाठी योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.