कोल्हापूर : विशाळगड परिसरात जोरदार पाऊस; भाततळी घाटात दरड कोसळली

कोल्हापूर : विशाळगड परिसरात जोरदार पाऊस; भाततळी घाटात दरड कोसळली

विशाळगड; पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील किल्ले विशाळगड परिसरात जोरदार पाऊस झाला. यादरम्यान विशाळगड मार्गावरील पावनखिंड नजीकच्या भाततळी घाटात गुरूवारी (दि.२०) दुपारच्या सुमारास दरड कोसळली. दगड रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.

या घाटातून विशाळगड, आंबा, गजापूर, केंबुर्णेवाडी, मुसलमानवाडी, दिवाणबाग, बौध्दवाडी, मलकापूर, अनुस्कुरा, येळवन जुगाई आदी भागात जाता येते. या घाटात गेळवडे जलाशयाचा निसर्गरम्य विलोभनीय दृश्य, घनदाट जंगल पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. या परिसरातील जनतेसाठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने तसेच किल्ले विशाळगडाला याच मार्गाने पावनखिंड पाहून जाता येत असल्याने हा घाट वर्दळीचा आहे. घाट तीव्र वळणाचा, चढ-उताराचा आहे. शिवाय खोल दरीलगत असल्याने वाहनचालकाची एक चूक प्रवासी वर्गासाठी धोकादायक बनू शकते. दरड कोसळली तेव्हा वर्दळ नसल्याने मोठा अपघात टळला.

निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या निसर्गरम्य भाततळी घाटात पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भाततळी घाट मार्गाची पर्यटकांवर नेहमीच मोहिनी असते. निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेण्‍यासाठी पर्यटक नेहमी मोठ्या संख्‍येने इथे येत असतात. मात्र या ठिकाणी पर्यटकांसाठी पुरेशा प्रमाणात सोयी-सुविधा उपलब्‍ध नाहीत. पर्यटकांना पर्यटनात्मक सोयी-सुविधा पुरविण्‍यासाठी शासनाने ठोस पावले उचलणे आवश्‍यक आहे. तसेच घाटमार्गाचा विकास पर्यटनाच्या दृष्टिकोनातून होणे गरजेचे आहे. संबंधित विभागाने रस्त्यावरील दगड बाजूला हटविण्याची मागणी प्रवासी, पर्यटक व स्थानिकांतून होत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news