कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग रद्दसाठी 12 जुलैचा अल्टिमेटम

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग रद्दसाठी 12 जुलैचा अल्टिमेटम
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : 'शक्तिपीठ महामार्ग रद्द'ची घोषणा 12 जुलैपर्यंत करा, असा अल्टिमेटम जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी मंगळवारी राज्य शासनाला दिला. जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढत, याबाबत निर्णय घेतला नाही तर आंदोलन तीव्र करू; त्यातून होणार्‍या परिणामांना सामोरे जाण्यासाठी तयार राहा, असा सज्जड इशाराही शेतकर्‍यांनी दिला. जोपर्यंत हा महामार्ग रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, ते सुरूच ठेवण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.

गोवा-नागपूर शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शक्तिपीठ महामार्गविरोधी कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. 'एकच जिद्द – शक्तिपीठ महामार्ग रद्द' असा नारा देत या मोर्चात जिल्ह्याभरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चात महिलांची संख्या लक्षवेधी होती.

सकाळी दहापासूनच शेतकरी, आंदोलक दसरा चौकात जमण्यास सुरुवात झाली. जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून वाहनांतून शेतकरी येत होते. सकाळी अकराच्या सुमारास खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील, आ. जयश्री जाधव यांचे आगमन झाले. प्रचंड पोलिस बंदोबस्तामुळे परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास संपूर्ण दसरा चौक शेतकर्‍यांच्या गर्दीने भरून गेला होता.

'जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची', 'शेती वाचवा, देश वाचवा', 'शेतकरी वाचवा, देश वाचवा' अशा घोषणा देत दुपारी बारा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. खा. शाहू महाराज शेतकर्‍यांसोबत चालतच मोर्चात सहभागी झाले होते. भर उन्हात घोषणा देत शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाले. दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, असेंब्ली रोडमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आला. तिथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्यासपीठही उभारण्यात आले होते.

शेतकर्‍याची सोबती असणार्‍या बैलगाडीसह आसूड घेऊन शेतकरी सहभागी झाले होते. सजविलेल्या बैलांच्या पाठीवरील 'शेती वाचवा, देश वाचवा', 'शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे' अशा घोषणा असणारी झूल लक्षवेधी ठरली. यमराजाच्या वेशातील शेतकर्‍याने उपस्थितांचे लक्ष वेधले. महामार्ग रद्दची मागणी करीत शेतकरी सरकारवर आसूड ओढत मोर्चात सहभागी झाले होते. लक्षवेधी फलक, घोषणांमुळे मोर्चाचा मार्ग दणाणून गेला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सभा झाल्यानंतर शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफही उपस्थित होते.

मोर्चात खा. शाहू महाराज, आ. सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील, आ. जयश्री जाधव, आ. राजू आवळे, माजी आमदार संजय घाटगे, के. पी. पाटील, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे, शिवाजी मगदूम, सम—ाट मोरे, कॉ. उदय नारकर, अतुल दिघे, सुभाष जाधव, बाबासाहेब देवकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, भैया माने, युवराज पाटील, भगवान काटे, शिवानंद माळी, राहुल आवाडे, अंबरीश घाटगे, प्रसाद खोबरे, बाबासाहेब देवकर, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, प्रकाश चौगुले, कर्णसिंह गायकवाड, रामराजे कुपेकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news