

Ladki Bahin Yojana
कोल्हापूर : लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या पंधराशे रुपयांच्या हप्त्याबाबत महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी (दि.७ ऑगस्ट) महत्त्वाची माहिती दिली. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेचा हप्ता द्यायला सुरुवात झाली आहे. कालपासून पात्र लाभार्थ्यांना याचे वितरण सुरू झाले आहे, असे तटकरे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
रक्षाबंधन ९ ऑगस्ट रोजी आहे. त्यापूर्वी महिलांच्या खात्यावर ६ ऑगस्टपासून लाडकी बहिण योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी (१५०० रुपये) वितरित करण्यात येईल, असे याआधी तटकरे यांनी सांगितले होते. त्यानुसार पात्र महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
बोगस लाभार्थ्यांबाबत त्या म्हणाल्या की, माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने काही डाटा आमच्याकडे दिला आहे. त्याची पडताळणी करण्यासाठी आम्हाला पुढचा १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. १५ दिवसांत बोगस लाभार्थ्यांचा आकडा समोर येईल. जर पुरुषांनी अथवा चुकीच्या व्यक्तीने याचा लाभ घेतला असल्याचा समोर आल्यास त्याच्यावर कडक कारवाई होईल.
लाडकी बहीण योजनेचे सुमारे अडीच कोटी लाभार्थी आहेत. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या योजनेद्वारे महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १,५०० रुपये जमा केले जातात.
दरम्यान, सुमारे अडीच कोटी लाभार्थ्यांपैकी २६.३४ लाख लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. जून २०२५ पासून या अपात्र लाभार्थ्यांचा लात्र तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. या योजनेसाठी काही निकष आहे. त्यानुसार छाननी करुन काही महिलांना या योजनेचा लाभ घेण्यापासून अपात्र ठरवण्यात आले आहे.
दरम्यान, रायगड पालकमंत्रीबाबत बोलताना तटकरे म्हणाल्या की, पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य त्यावेळी निर्णय घेतील. रायगड आणि नाशिक जिल्ह्यावर अन्याय होणार नाही आणि निधीची कमतरता होणार नाही याची काळजी तिन्ही नेते घेतील. काल एकनाथ शिंदे आणि तटकरे यांची सदिच्छा भेट झाली. पीएममोदी आणि अमित शाह यांनी एनडीएच्या सर्व घटक पक्षांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला ही नेतमंडळी गेली होती. पालकमंत्री संदर्भात या भेटीमध्ये कुठलीही चर्चा असण्याचा संबंध नाही. महायुतीसाठी पालकमंत्री पद एक मोठी अडचण आहे असे अजिबात नाही. काही अडचणी असल्या तरी काही गोष्टीत व्यापक चर्चा होणेदेखील आवश्यक आहे. वरिष्ठ नेत्यांना जेव्हा योग्य वाटेल तेव्हा ते पालकमंत्री पदासंदर्भातला निर्णय घेतील. पालकमंत्री पद म्हणजे सर्वस्वच नाही, हा त्यातला एक छोटासा भाग आहे. मी महायुती सरकारमध्येच काम करते.